सकाळच्या सत्रात मतदानासाठी नागरिकांची गर्दी : मात्र मतदानाची टक्केवारी घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पहायला मिळाली. लढत तिरंगी असली तरी मतदारांमध्ये तितकासा उत्साह दिसला नाही. सकाळच्या सत्रात चांगल्या प्रमाणात मतदान झाले. परंतु, जसजसा उन्हाचा तडाखा वाढायला लागला तसतशी मतदानाची टक्केवारी कमी झाली. दुपारी 4 नंतर काही प्रमाणात मतदार मतदान केंद्रांवर दाखल झाले. परंतु, मतदानाचा आकडा मात्र तितकासा वाढताना दिसला नाही. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. कामाला जाणाऱ्या नागरिकांनी सकाळी 7 ते 9 यावेळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी असल्याने मोबाईल बाहेरच ठेवावे लागले. मतदान करताना काहीजण व्हिडिओ शूटींग करून ते नंतर स्टेटस ठेवत असल्याने मतदानातील गुप्तता पाळली जात नसल्याने मोबाईलवर बंदी आणण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल बाजूला ठेवूनच नागरिकांना आत जावे लागले. सेंट झेवियर्स येथील मतदान केंद्रात सकाळच्या सत्रात चांगल्या प्रकारे मतदान झाले. विनायकनगर येथील मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रवेश दिला नसल्याने वादावादीचे प्रकार घडले. शाहूनगर येथील मराठी शाळेमध्ये सुरळीत पद्धतीने मतदान सुरू होते. दुपारनंतर उन्हाचा तडाखा जाणवल्याने गर्दी काहीशी कमी झाली होती.

य् ामनापूर येथील मतदान केंद्रावर दुपारनंतर तुरळक गर्दी होती. मतदारांना मतदान करण्यासाठी घरोघरी जाऊन आवाहन केले जात होते. कणबर्गी येथे गावातील तीन मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. येथील सिद्धेश्वर हायस्कूल मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गांधीनगर परिसरात शांततेत मतदान झाले. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा फौजफाटा होता. महांतेशनगर येथे दुपारनंतर तुरळक गर्दी होती. बेळगाव उत्तरमध्ये यावेळी तिरंगी लढत झाली. प्रबळ दावेदार असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी अॅड. अमर येळ्ळूरकर यांना उमेदवारी दिली. भाजपने विद्यमान आमदार अनिल बेनके यांना डावलून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर काँग्रेसने माजी आमदार फिरोज सेठ यांचे बंधू राजू सेठ यांना उमेदवारी दिली. तिन्ही उमेदवार नवखे असले तरी लढत मात्र रंगतदार झाली. अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी चव्हाट गल्ली येथील मतदान केंद्रावर मतदान केले. डॉ. रवी पाटील यांनी सदाशिवनगर मतदान केंद्रावर आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदानाचा हक्क बजावला. राजू सेठ यांनीही आपल्या कुटुंबासमवेत मतदान केले. बेळगाव उत्तर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.18 टक्के मतदान झाले. दुपारी 11 वाजेपर्यंत 19.38 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.26 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 44.18 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.84 टक्के मतदानाची नोंद झाली होती. निवडणूक विभागाने नागरिकांना आवाहन करूनदेखील म्हणावे तितके मतदान झाले नाही. बेळगाव उत्तर तसा सुशिक्षित नागरिकांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. परंतु, यावेळी मात्र उत्तर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
गोंधळी गल्लीतील वृद्ध दाम्पत्याचे हाल
वृद्धांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले. परंतु, काही वृद्धांना अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे लागले. गोंधळी गल्ली येथील मोहन दातार (वय 87) यांना व त्यांच्या पत्नीला गोंधळी गल्ली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागले. मोहन यांना व्यवस्थित चालताही येत नसल्याने त्यांची गैरसोय झाली.
अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वत्र सुरळीत व शांततेत मतदान पार पडले. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांच्या बाहेर गर्दी होती. मतदान करण्यासाठी सकाळच्या सत्रात असंख्य नागरिक बाहेर पडले होते. मात्र दुपारी उन्हाचा चटका वाढल्यानंतर गर्दी ओसरली. त्यामुळे काही मतदार केंद्रांवर थंडा प्रतिसाद दिसून आला. विशेषत: उत्तर मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला होता. मतदान करण्यासाठी काही मोजकेच नागरिक उपस्थित होते. तसेच मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्याने गर्दी दिसून आली नाही. ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांचे ओळखपत्र क्रमांक पाहण्यासाठी बीएलओंची नियुक्ती करण्यात आली होती. कोनवाळ गल्ली येथील मतदान केंद्रावर 3 बीएलओंची नियुक्ती करून मतदारांना नावे शोधण्यास मदत करण्याची जबाबदारी सोपविली होती. काही ठिकाणी मतदारयादीत घोळ झाल्याचेही निदर्शनास आले. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदारयादीत व वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाल्याचे दिसून आले. एकाच घरात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची नावे एका ठिकाणी तर काहींची दुसऱ्या ठिकाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मतदारांना धावपळ करावी लागली. मतदारयादीतील नावे सापडली नसल्याने मतदान हक्कापासून वंचित राहावे लागले. शेट्टी गल्ली परिसरात असलेल्या मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी झाली होती. पण मतदान करण्यास बराच वेळ लागत होता. काही मतदार एक तासाहून अधिक वेळ रांगेत थांबून होते. मतदान प्रक्रिया संथरित्या चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. याबाबत संबंधित मतदान केंद्रावर चौकशी केली असता, ज्येष्ठ नागरिक आणि मतदारांची नावे यादीत सापडत नसल्याने प्रक्रियेस विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. च् ाव्हाट गल्ली येथील मराठा मंडळ शाळेमध्ये दोन मतदान केंद्रांवर दुपारी 12 वा. शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे मतदान झाले की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र यावेळी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता 30 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचे सांगण्यात आले. दुपारी उन्हामुळे बहुतांश नागरिक मतदान करण्यास घराबाहेर पडले नाहीत. मात्र दुपारच्या सत्रात असंख्य मतदारांनी हक्क बजावला. चव्हाट गल्ली येथील मराठा मंडळ शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 194 मध्ये 1 हजार 95 मतदार असून यापैकी 285 मतदारांनी व केंद्र क्रमांक 199 मधील 890 पैकी 265 मतदारांनी दुपारी 12 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रांसमोर मंडपची व्यवस्था
निवडणूक आयोगाने मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला केली होती. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिकांना उन्हात थांबावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रासमोर मंडप घालून सावलीची व्यवस्था करण्याची सूचना केली होती. याची दखल घेत सावली नसलेल्या मतदान केंद्रांवर मंडप घातले होते. त्याचप्रमाणे मतदारांच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. उन्हामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर फॅन लावण्याची सूचना केली होती. पण प्रशासनाने कोणत्याच केंद्रावर फॅनची सुविधा उपलब्ध केली नाही. त्यामुळे रांगेत थांबलेल्यांना त्रास सहन करावा लागला.
मतदानामुळे बाजारपेठेत शुकशुकाट…
बुधवारी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने बाजारपेठेत नागरिक येणार नसल्याने दुकाने बंद होती. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार या मुख्य बाजारपेठेमध्ये बुधवार असूनही शुकशुकाट होता. प्रत्येकजण निवडणुकीच्या तयारीमध्ये असल्याने बाजारपेठेत कोणीच फिरकले नाही. यामुळे दुकाने न उघडणे व्यापाऱ्यांनी पसंत केले. सायंकाळच्या सुमारास काही जणांनी दुकाने उघडली. परंतु, नागरिकांचा प्रतिसाद नव्हता.
पत्रकारांना छायाचित्रे घेण्यास मज्जाव…
मतदान केंद्रांवर मतदानासाठी झालेली गर्दी आणि त्याठिकाणी चाललेल्या घडामोडींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तेथील वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार गेले असता, त्यांना मतदान केंद्रावर जाण्यास राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. विजयनगर, पाटील गल्ली तसेच विविध ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवरील गर्दीची छायाचित्रे घेण्यास आक्षेप घेतला. वृत्तपत्रासाठी छायाचित्र हवे असल्याचे सांगण्यात आले तरी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे काही ठिकाणी पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. लोकशाहीमार्गाने नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार आणि चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधींना मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे लोकशाही आहे की नाही? असा मुद्दा उपस्थित होत आहे.









