600 हून अधिक जखमी : लष्कर-निमलष्करी दलात चकमक
वृत्तसंस्था / खार्तूम
सुदानची राजधानी खार्तूममध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये शनिवारी सुरू झालेले युद्ध अजूनही सुरूच आहे. यामध्ये रविवारपर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हिंसाचारात अल्बर्ट ऑगस्टीन या एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याचे भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आले. हिंसाचारादरम्यान गोळी लागल्याने अल्बर्ट याचा मृत्यू झाला आहे.
सुदानमध्ये दोन दिवसांपूर्वीपासून संघर्ष भडकल्यानंतर भारतीयांना सतर्कतेचे आदेश देत घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. या घटनेवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्यही आले आहे. खार्तूममधील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून भारत त्यावर लक्ष ठेवून आहे. एका भारतीयाच्या मृत्यूलाही त्यांनी दुजोरा दिला आहे. या घटनेबद्दल सरकारला शोक असून भारतीय दुतावास कुटुंबाला सर्व मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सुदानमधील डल ग्रुप कंपनीत काम करणाऱ्या अल्बर्ट ऑगस्टीनला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे भारतीय दुतावासाने म्हटले आहे. पुढील व्यवस्थेसाठी दुतावास त्याचे कुटुंबीय आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
सुदानमधील भारतीय दुतावासाने शनिवारीच भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि घरातच राहण्याचा सल्ला दिला होता. लष्कर आणि निमलष्करी दलात प्रचंड तणाव सुरू असून हिंसाचाराचा भडका आता राजधानीच्या बाहेरही पोहोचला आहे. राजधानीच्या मध्यवर्ती भागात तसेच शेजारच्या बहरी शहरातही गोळीबाराचे सत्र सुरू आहे.
2021 मध्ये जनरल अब्देल-फतेह बुरहान यांच्या नेतृत्वाखालील लष्करी बंडानंतरच सुदानमध्ये अराजकतेची स्थिती आहे. ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ) म्हणून ओळखले जाणारे निमलष्करी दल आणि लष्कर यांच्यातील तणाव अलिकडच्या काही महिन्यात वाढल्यामुळे देशातील लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी राजकीय पक्षांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थित करारावर स्वाक्षरी होण्यास विलंब होत आहे. रॅपिड सपोर्ट फोर्सच्या (आरएसएफ) नियमित सैन्यातील एकीकरणावरून काही आठवड्यांच्या तणावानंतर शनिवारी देशात हिंसाचार सुरू झाला. निमलष्करी दलाने सेनेच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्ष चिघळल्याचे सांगण्यात आले. दक्षिण खार्तूममधील आरएसएफ तळाजवळ हिंसाचार भडकला. आरएसएफने खार्तूम विमानतळाचा ताबा घेतला आहे.









