वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाक महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निदा दारची नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर पाकची कर्णधार बिस्मा मारुफ हिने आपल्या पदाचा त्याग केल्याने तिच्या जागी आता अनुभवी वयस्कर निदा दार हिची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाक महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी आता मार्क कोलेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही 2017 आणि 2019 या कालावधीत मार्क कोलेस हे पाक महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे पाकचा माजी कसोटीवीर सलीम जाफरची पाक महिला निवड समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सलीम जाफरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 99 वनडे आणि 130 टी-20 सामने खेळले आहेत. 2023 ऑगस्ट ते 2024 जुलै दरम्यान पाक महिला क्रिकेट संघाचा भरगच्च कार्यक्रम आहे. या कालावधीदरम्यान पाक महिला संघ काही द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. 2024 साली महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेशमध्ये तर 2025 सालातील आयसीसी महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे.









