वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायली जेमिसन याला गेल्या काही दिवसांपासून पाठदुखापतीची समस्या सातत्याने जाणवत होती. आता या समस्येवर वैद्यकीय सल्ल्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. जेमिसनने या दुखापतीवर चालू आठवडाअखेर शस्त्रक्रिया करवून घेण्याचा घेतला आहे. आता तो किमान चार महिने क्रिकेटपासून अलिप्त राहणार असल्याचे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले.
इंग्लंड विरुद्धच्या 16 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत जेमिसन खेळेल, असा अंदाज होता. पण जेमिसनला या दुखापतीच्या वेदना अधिक होऊ लागल्याने तज्ञ डॉक्टरांनी त्याला एमआरआय स्कॅनिंगचा सल्ला दिला होता. तातडीने त्याने हे स्कॅनिंग करवून घेतले. स्कॅनिंगचा अहवाल तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेनंतर जेमिसनला किमान चार महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. जेमिसनची उणीव न्यूझीलंडला चांगलीच भासत आहे. दोन सामन्यांच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. जेमिसनने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 16 कसोटीत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना 72 गडी बाद केले आहेत. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया इंग्लंड विरुद्धच्या दुसऱया कसोटीसाठी न्यूझीलंड संघामध्ये आता जेमिसनच्या जागी मॅट हेन्रीचा समावेश करण्यात आला आहे.









