वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रय़ू मॅकडोनाल्ड यांनी दुसऱया कसोटीच्या दुसऱया डावात ज्या प्रकारे संघ गडगडला त्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलिया भारतातील परीक्षेत अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले आहे. आमच्या खेळण्याच्या पद्धतीवर टीका होईल आणि ते योग्यच आहे. दुसऱया दिवशीच्या शेवटी जर आमची तयारी चांगली आहे असे म्हटले असते, तर कदाचित वेगळी प्रतिक्रिया आली असती. परंतु तिसऱया दिवशी एका तासाच्या आत लोक टीका करू लागले. तिसऱया दिवशी भारतातील परीक्षेत आम्ही नापास झालो, असे मॅकडोनाल्ड पुढे म्हणाले.
बेंगळुरूमधील फिरकीस पोषक खेळपट्टय़ांवर करण्यात आलेली तयारी फिरकीच्या आव्हानास तोंड देण्याच्या दृष्टीने पुरेशी होती. त्यामुळे कोणतीही सबब सांगता येणार नाही, असे मॅकडोनाल्ड पुढे म्हणाले. काही खेळाडू नेहमीच्या यशस्वी ठरलेल्या ‘गेम प्लॅन’पासून दूर गेले. त्यामुळे दुसऱया मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 1 मार्चपासून इंदूरमध्ये होणाऱया तिसऱया कसोटीसाठीच्या ऑस्ट्रेलिया संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. विशेषतः वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हे पहिले दोन सामने गमावल्यानंतर तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे.









