आघाडीत सामील पक्षाने काढून घेतला पाठिंबा ः मंत्र्यांनी दिले राजीनामे
वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने रविवारी पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे नेपाळमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. आघाडीत फूट पडल्याने अनेक मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने सरकार संकटात आले आहे.
आरएसपी पक्षाने रविवारी एका बैठकीनंतर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष रवि लामिछाने यांनी याची घोषणा केली आहे. 2022 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीत रवि लामिछाने यांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष चौथ्या क्रमांकाच्या जागा मिळविणारा पक्ष ठरला होता. या पक्षाला 20 जागा मिळाल्या होत्या. या पक्षाच्या पाठिंब्यानेच पुष्पकमल दहल आणि केपी ओली शर्मा यांनी मिळून सरकार स्थापन केले होते.
28 जानेवारी रोजी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात रवि लामिछाने यांना दुहेरी नागरिकत्वाप्रकरणी दोषी ठरविले होते. यामुळे त्यांना उपपंतप्रधानपद सोडावे लागले होते. या पार्श्वभूमीवरच त्यांनी सरकारची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
लामिछाने यांच्याकडे नेपाळसह अमेरिकेचेही नागरिकत्व असल्याचा आरोप आहे. याचमुळे त्यांना उपपंतप्रधान आणि गृहमंत्रिपद सोडावे लागले होते. तसेच संसद सदस्यत्व गमवावे लागले होते. नेपाळमध्ये दुहेरी नागरिकत्व अवैध मानले जाते. अमेरिकेचे नागरिकत्व न सोडताच नेपाळचा पासपोर्ट मिळविल्याचा आरोप लामिछाने यांच्यावर आहे. लामिछाने यांनी अमेरिकेचे ग्रीनकार्ड मिळविले होते.
अमेरिकेचे नागरिक म्हणूनच ते नेपाळमध्ये परतले होते. तसेच रद्द झालेल्या नेपाळी नागरिकत्वाच्या आधारावरच नेपाळचा पासपोर्ट मिळविला होता. नेपाळचे नागरिकत्व पुन्हा मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्याचा नियम आहे.









