गुप्तचर यंत्रणांनी केला पाकिस्तानच्या कटाचा खुलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी काश्मीरप्रकरणी पाकिस्तानच्या मोठय़ा कटाचा खुलासा केला आहे. या कटाच्या अंतर्गत पाकिस्तान जगभरातील स्वतःच्या दूतावासांच्या मदतीने काश्मीरप्रकरणी भारताच्या विरोधात दुष्प्रचार फैलावू पाहत होता. याकरता पाकिस्तानने एक टूलकिटही तयार केले असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानने सोशल मीडियावर काश्मीर मुद्दय़ासंबंधी खोटी माहिती फैलावण्यासाठी जगभरातील स्वतःच्या दूतावासांद्वारे निदर्शने करविण्याचा कट रचला आहे. पाकिस्तानने काश्मीर सॉलिडेरिटी डे या नावाखाली भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्यासाठी मोठी प्लॅनिंग केली आहे.
सोशल मीडियावर काश्मीरसंबंधी खोटय़ा कहाण्या आणि दुष्प्रचार फैलावण्यासाठी पाकिस्तानकडून एक विस्तृत टूलकिट तयार करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाकडून जगभरातील सर्व स्वतःच्या दूतावासांना पाठविण्यात आलेल्या सीक्रेट नोटमध्ये भारताच्या विरोधातील कटाला कशाप्रकारे मूर्त स्वरुप द्यावे यासंबंधी टूलकिट शेअर करण्यात आले आहे.
काश्मीरमध्ये सैन्याकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करत भारताच्या विरोधात जगाची दिशाभूल कशाप्रकारे करावी हे पाकिस्तानी विदेश मंत्रालयाने 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान स्वतःच्या दूतावासांना फॅक्स आणि ईमेलद्वारे सांगितले होते. या सीक्रेट नोटमध्ये यासाठी अनेक व्हिडिओ लिंक देखील शेअर करत त्यांचा निदर्शनांदरम्यान वापर करण्याचा निर्देश देण्यात आला होता.
जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये या खोटय़ा नॅरेटिव्हला उत्तम स्थान मिळावे याकरताही नियोजन करण्याचा निर्देश पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने स्वतःच्या दूतावासांना दिला आहे. पाक सरकारने काश्मीरवर जे टूलकिट तयार केले आहे, त्यात काश्मीरसंबंधी अनेक चुकीची माहिती आणि बनावट चित्रफितींची मदत घेण्यात आली आहे.









