वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय महिला क्रिकेटमधील अलीकडेच निवृत्त झालेली महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला महिला प्रिमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामावून घेतले असून तिच्यावर मेंटरची आणि गोलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्स हिची या संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चार्लोट एडवर्ड्स ही वनडे व कसोटीमध्ये सर्वाधिक धावा जमवणारी दुसऱया क्रमांकाची फलंदाज आहे. येत्या मार्चमध्ये डब्ल्यूपीएल स्पर्धा होणार असून भारताची माजी अष्टपैलू देवीका पळशिकरची फलंदाज प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य या संघाची व्यवस्थापक असेल.

मागील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्त झालेल्या झुलनने दोन दशकाहून जास्त व्यापलेल्या कारकिर्दीत 350 हून अधिक आंतरराष्ट्रीय बळी नोंदवले आहेत. महिला वनडेमध्ये तिच्याच नावावर सर्वाधिक बळींची नोंद असून महिलांच्या वनडे विश्वचषकात सर्वाधिक बळी तिने नोंदवले आहेत. आयसीसी महिलांच्या वनडे गोलदांजांच्या मानांकनातही तिने जानेवारी 2016 मध्ये अग्रस्थान पटकावले होते. निवृत्तीनंतर ती सध्या बंगाल महिला संघाची मेंटर म्हणून काम पाहत आहे.
एडवर्ड्सचीही दोन दशकांची कारकीर्द असून तिच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने वनडे व टी-20 व़िश्वचषक अजिंक्यपदे मिळविली. निवृत्तीनंतर ती ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधील संघांची प्रशिक्षक बनली असून आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्येही तिचा समावेश झालेला आहे. देवीका पळशिकर ही माजी फलंदाज व डावखुली स्पिनर असून ती 2014 ते 2016 या कालावधीत ती भारतीय महिला संघाची सहायक प्रशिक्षक होती. याशिवाय तिने बांगलादेश महिला संघाची सहायक प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. त्या संघात असताना बांगलादेशने 2018 मध्ये आशियाई चषकही जिंकला आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून डब्ल्यूपीएलमधील संघ त्यांनी 912.99 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.









