पाण्याविना शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांचे हाल
बेळगाव : शिवाजीनगर परिसरात पाणीसमस्या निर्माण झाली असून नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी या परिसरात कूपनलिकेची खोदाई करण्यात आली आहे. मात्र या कूपनलिकांना विद्युतपंप जोडण्यात आला नाही. विद्युतपंप जोडून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सध्या शहरात सर्वत्र भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. या समस्येचे निवारण करण्याकरिता पाच महिन्यापूर्वी शिवाजीनगर परिसरात कूपनलिकेची खोदाई करण्यात आली होती. कूपनलिका खोदल्यानंतर त्याठिकाणी विद्युतपंप बसून पाणी पुरवठा करणे आवश्यक होते. पण विद्युतपंप बसविण्याकडे कंत्राटदारांने पाच महिन्यापासून कानाडोळा केला आहे. सदर ठिकाणी विद्युतपंप बसविण्यात यावा, या मागणीकरिता मागील काही दिवसापासून पाठपुरावा करण्यात येत आहे. पण याची दखल एलअँडटी आणि महापालिकेने घेतली नाही. त्यामुळे या परिसरात पाणीसमस्या भेडसावत आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी महापालिकेला धडक दिली. तसेच यावेळी अधिक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांची भेट घेऊन कूपनलिकेबाबत तक्रार केली. कूपनलिकेची खोदाई केल्यानंतर कंत्राटदार गायब झाला आहे.कूपनलिकेवर विद्युतपंप बसवून पाणी पुरवठा सुरू करण्याची गरज आहे. पण याकडे कानाडोळा केल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.









