बांधकाम संथगतीने सुरू असल्याने रहिवाशांना त्रास

बेळगाव : शहर आणि उपनगरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र कपिलेश्वर कॉलनीमधील गटारीचे बांधकाम संथगतीने सुरू असून सध्या येथील गटारी कचरा आणि सांडपाण्याने तुंबल्या आहेत. परिणामी येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. शहरातील अनेक विकासकामांबाबत तक्रारी होत असून वेळेवर काम पूर्ण केले नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. कपिलेश्वर कॉलनीमधील गटारीचे बांधकाम हाती घेऊन महिना उलटला तरी सदर बांधकाम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. गटारीचे बांधकाम करण्यासाठी सांडपाणी अडविण्यात आले आहे. परिणामी गटारी सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गटारीच्या अर्धवट बांधकामामुळे रहिवासी कंटाळले आहेत. गटारीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळी सूचना केल्या. पण सदर काम महापालिकेच्यावतीने करण्यात येत नसल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार होत आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास गटारीमधून पाणी तुंबून राहते. काहीवेळा येथील घरामध्ये नाल्याचे पाणी शिरते. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या वळीव पाऊस येत असल्याने गटारीचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र सदर कंत्राटदार काम पूर्ण करीत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. येथील गटारीमुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.









