तब्बल 75 वर्षांनी भरत असल्यामुळे माहेरवासिनी व पै-पाहुण्यांची वर्दळ : भंडाऱ्याच्या उधळणीत रथ मिरवणुकीला सुरुवात

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
लक्ष्मी माता की जय, लक्ष्मीदेवीचा विजय असो, हर हर महादेवच्या जयघोषात अलतगे गावची ग्रामदैवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला भक्तीपूर्ण वातावरणात अमाप उत्साहात मंगळवारी सुरुवात झाली. सदर यात्रा तब्बल 75 वर्षांनी भरत असल्यामुळे माहेरवासिनी व पै-पाहुण्यांनी संपूर्ण गाव भरुन गेल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी पहाटेपासून ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीच्या विवाहासाठी गावातील आबालवृद्धांबरोबर समस्त ग्रामस्थ व महिला श्री लक्ष्मीदेवीच्या मंदिर परिसरात जमत होते. बरोबर 6 वाजून 15 मिनिटांनी सूर्योदयाला समस्त ग्रामस्थांच्या साक्षीने अक्षतारोपण करण्यात आले. देवीच्या विवाहापूर्वी मातंगी देवाची मूर्ती भक्तीपूर्ण वातावरणात श्री लक्ष्मीदेवीच्या बाजूला आणून बसविण्यात आली. यानंतर पाटील कुटुंबीय व हक्कदारांच्यावतीने लक्ष्मीदेवीचे बाशिंग ढोलवाद्यांच्या मिरवणुकीने आणण्यात आले. यानंतर गणपत सुतार यांच्या हस्ते सपत्नीक श्री लक्ष्मीदेवीचे पूजन करण्यात आले. कांबळे परिवाराच्यावतीने लक्ष्मीदेवीचे दोन पालवे आणण्यात आले. यानंतर सुवासिनींच्या हस्ते जोडवी घालणे, हातात कंकण घालणे आदी कार्यक्रम पार पडले. य् ााप्रसंगी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील व त्यांच्या पत्नी कविता पाटील यांचा सोमनाथ आलोजी व कविता सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश आलोजी व सोमनाथ आलोजी यांच्या हस्ते पालव्यांचे पूजन करण्यात आले. मलगौडा पाटील यांच्या हस्ते सपत्नीक श्री लक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर संपूर्ण गाव समृद्ध होऊ देत, अशी मागणी करत गाऱ्हाणे घालण्यात आले. उपस्थित सर्व ग्रामस्थांना अक्षतांचे वाटप करण्यात आले. यानंतर हभप परशराम महाराज व हभप ईराप्पा जाधव यांनी म्हटलेल्या मंगलाष्टकानंतर बरोबर 6 वाजून 15 मिनिटांनी अक्षतारोपण करून श्री लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र दिसून येत होते.
श्र् ााr महालक्ष्मी देवी रथावर विराजमान
6 वाजून 18 मिनिटांनी समस्त ग्रामस्थ व पै-पाहुण्यांच्या उपस्थितीत श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर सकाळी 8 वा. सुतार परिवार, देवस्थान पंचकमिटी, श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या हस्ते देवीची मूर्ती रथामध्ये विराजमान करण्यात आली. यानंतर केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या पत्नी कविता पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री महालक्ष्मी देवीचा रथ ओढणे कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
अमाप उत्साहात रथ ओढणी
लक्ष्मीदेवीच्या मंदिरापासून भक्तीपूर्व वातावरणात व भंडाऱ्याची उधळण करत अमाप उत्साहात रथ ओढणीला सुरुवात करण्यात आली. रथ पाटील गल्ली, भरमदेव गल्ली, हवेशीर गल्ली, ब्रह्मलिंग गल्ली, तानाजी गल्लीमधून मिरवणुकीने ओढत सायंकाळी मरगाई मंदिराजवळ मिरवणूक थांबविण्यात आली. या ठिकाणी लक्ष्मीदेवी संपूर्ण रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गदगेकडे विराजमान होण्यासाठी निघते, अशी आख्यायिका आहे. प्रारंभी देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष चंद्रकांत धडूम व मनोहर भातकांडे यांनी नागरिकांना देवीचा रथ ओढतेवेळी घ्यावयाच्या खबरदारी सांगितल्या.
हेस्कॉमकडून सहकार्य
देवीचा रथ ज्या-ज्या गल्ल्यांतून मिरवणुकीने जात होता. त्यापूर्वी हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत खांबावरुन ओढण्यात आलेल्या विद्युततारा मोकळ्या करून लक्ष्मीदेवीचा रथ ओढण्याचा मार्ग सुलभ करत होते. यामुळे हेस्कॉम कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
घरांवर विद्युgत रोषणाई नाही
गावातील प्रत्येक घरावर भाविकांकडून विद्युत रोषणाई करण्यात आल्यास क्षमतेच्या अधिक प्रमाणात वीज वापर होऊन गावातील वीजपुरवठा खंडित होऊ नये ही दक्षता घेत यात्रा कमिटीने गावातील कुणीही भक्ताने आपल्या घरावर विद्युत रोषणाई करू नये, असे सांगितले होते. हे ध्यानात घेऊन कुणीही नागरिकांनी आपल्या घरावर विद्युत रोषणाई केली नाही. त्यामुळे नऊ दिवस गावात योग्य विद्युत पुरवठा राहण्यास मदत होणार असल्याचेही यात्रा कमिटीने सांगितले.
लक्ष्मीदेवी आज गदगेवर विराजमान होणार
ग्रामदैवत श्री मरगाई मंदिराजवळून बुधवारी सकाळी विधिवत पूजन करून रथ ओढणी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. हायस्कूल रोड, दत्त मंदिर रोड, गणेशनगर परिसर रथ मिरवणूक फिरुन आल्यावर सायंकाळी 5 वाजता ब्रह्मलिंगेश्वर हायस्कूलच्या पटांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये लक्ष्मीदेवी गदगेवर विराजमान होणार आहे.
य् ाात्रा कमिटीचा वेगळा उपक्रम
सध्याच्या काळात यात्रा पार पाडणे आर्थिक सधन कुटुंबांना काही फरक पडत नाही. परंतु सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. समाजाबरोबर आपणही यात्रा साजरी करणे गरजेचे असते. यासाठी त्यांची आर्थिक ओढाताण होते. ही अडचण लक्षात घेऊन अलतगे देवस्थान पंचकमिटी व महालक्ष्मी यात्रा कमिटीने गावातील जवळ-जवळ 25 ते 30 कुटुंबांना यात्रेसाठी आर्थिक मदत करून वेगळा आदर्श दाखविला आहे. तसेच सदर गावाने गावातील कोणाही कुटुंबाकडून वर्गणी न काढता यात्रा करून तालुक्यातील इतर गावांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत चंद्रकांत धुडूम, चेतक कांबळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.









