जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांची माहिती
बेळगाव : जनावरांसाठी दि. 26 सप्टेंबर ते दि. 25 ऑक्टोबरपर्यंत लाळ्याखुरकत लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी औषधाचा कोणत्याच प्रकारचा तुटवडा निर्माण होवू नये. अभियान राबविण्यासाठी जागृती करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या चौथ्या टप्प्यातील लाळ्याखुरकत लसीकरण अभियानाच्या बैठकीत ते बोलत होते. लसीकरण यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक गावात अभियान राबविण्यात यावे. लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. कोणत्याही गावात समस्या उद्भवू नये याची दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटणाऱ्या या रोगापासून राज्याला मुक्त करायचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सदर रोग शेती उपयोगी जनावरांसह दुभती जनावरे, डुक्करांनाही होतो. यामुळे ही जनावरे पाळणाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या रोगाची बाधा झाल्यास गर्भधारणा धरण्याची सामर्थता कमी होते. दुधाचे प्रमाण घटते. या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी तीन महिन्यावरील सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावे. शेतकरी व दुभती जनावरे पाळणाऱ्या जनावर मालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हर्षल भोयर यांनी केले. यावेळी पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक राजीव कुलेर, तालुका वैद्याधिकारी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
लाळखुरकत अभियान साहित्याचे उद्घाटन
चौथ्या टप्प्यातील लाळखुरकत लसीकरण अभियान दि. 25 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते लसीकरण अभियानासाठी लागणाऱ्या साहित्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकाचेही अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर व इतर अधिकारी उपस्थित होते.









