पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांचा उपक्रम : श्रीमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक
बेळगाव : कोणत्याही भक्ताने श्रद्धेने एखाद्या देवाची प्रार्थना केली, की देव निश्चित प्रसन्न होतो. भेद माणसामाणसांमध्ये केला जातो किंवा माणसेच हा भेद करतात. कोणत्याही धर्माचा देव मग तो अल्ला किंवा येशू किंवा कोणी असो. त्यांच्यासाठी प्रार्थना आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. सर्वच धर्मांनी मानवता आणि सर्व धर्म समभाव हाच संदेश दिला आहे. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे, बेळगावमध्ये ठिकठिकाणी पोलीस स्थानकांमध्ये मुस्लीम अधिकाऱ्यांतर्फे केली जाणारी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होय. माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची हे दरवर्षी ते ज्या पोलीस स्थानकामध्ये असतील, तेथे श्रीमूर्तीची आवर्जून प्रतिष्ठापना करतात. मध्यंतरी काहीकाळ ते हुबळीमध्ये होते. अलीकडेच ते बेळगावला माळमारुती पोलीस स्थानकामध्ये रुजू झाले आहेत. मंगळवारी त्यांनी उत्साहाने श्रीमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढून पोलीस स्थानकामध्ये प्रतिष्ठापना केली. बेळगावमध्ये अनेक पोलीस स्थानकांमध्ये मुस्लीम अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, दरवर्षी ते गणरायाची प्रतिष्ठापना करतात. इतकेच नव्हे तर महाप्रसाद करून परिसरातील सर्व नागरिकांना आमंत्रित करतात.
यापूर्वीही अनेकांकडून मूर्तीप्रतिष्ठापना
कर्नाटक राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले जावेद मुशापुरी यांनी अलीकडेच गोकुळाष्टमीला आपल्या मुलांना श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषेमध्ये सजविले होते. तर बेळगावमधील जिल्हा सीईएन विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला, महिला पोलीस स्थानकाचे सुलेमान तहसीलदार या सर्वांनीच यापूर्वी गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावाने केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जातीय सलोखा, सौहार्दता आणि परस्पर सामंजस्य यांचे नाते दृढ होत आहे.









