वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेन याने शुक्रवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील क्विन्सलँड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात स्पेन तास्मानिया संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पेनचा हा शेवटचा प्रथम श्रेणी सामना राहणार आहे.
टीम पेनने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविले होते. 2018 साली ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला असताना तत्कालिन कर्णधार स्टीव्ह स्मिथ व त्याच्या काही सहकाऱ्यांना चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात निलंबित व्हावे लागले होते. त्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या जागी टीम पेनची ऑस्ट्रेलियन संघाचा 46 वा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टीम पेनने 2018 ते 2021 या कालावधीत 23 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. तसेच त्याने एकूण 35 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2010 साली लॉर्ड्सच्या मैदानावर टीम पेनने आपले कसोटी पदार्पण पाक संघाविरुद्ध केले होते.









