तृणमूलच्या महिला नेत्याचे लोकसभा सदस्यत्व संकटात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये एकीकडे अनेक तृणमूल काँग्रेसचे नेते आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत. तर आता पक्षाच्या लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचा तसेच सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविल्याचा आरोप झाला आहे. पैसे अन् भेटवस्तूच्या बदल्यात विदेशात स्थायिक उद्योगपती दर्शन हीरानंदानी यांच्या हितांसाठी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप मोइत्रा यांच्यावर झाला आहे.
मोइत्रा यांच्यावर झालेला आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. 2005 मध्ये अशाच एका प्रकरणात अनेक खासदारांना सदस्यत्व गमवावे लागले होते. मागील काही वर्षांमध्ये महुआ मोइत्रा यांनी स्वत:च्या आक्रमक भूमिकेमुळे फायरब्रँड नेत्याची प्रतिमा तयार केली होती. महुआ यांनी आतापर्यंत सभागृहात 61 प्रश्न विचारले आहेत, यातील 50 प्रश्न संबंधित उद्योगपतीच्या व्यवसायाशी निगडित राहिले आहेत असा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केला आहे.
दिल्लीतील वकील जय अनंत देहाद्रई यांनी याप्रकरणी पूर्ण पडताळणी केली आहे. लोकसभेत महुआ यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची लिंक अटॅच केली आहे आणि विचारण्यात आलेला प्रश्न कशाप्रकारे एकाच उद्योगपतीशी संबंधित होते हे देखील नमूद केल्याचे दुबे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
काही प्रश्न अदानी समुहाशी निगडित होते, अदानी समुहाच्या विरोधात महुआ यांचे कथित मित्र उद्योगपती हिरानंदानी यांची कंपनी संघर्ष करत होती असेही समोर आले आहे. निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्यावरील आरोपांप्रकरणी समिती स्थापन करत कारवाईची मागणी केली आहे.
फायरब्रँड प्रतिमा तयार करणाऱ्या महुआ मोइत्रा या प्रत्यक्षात पैसे घेऊन प्रश्न विचारणाऱ्या निघाल्या. हा केवळ संसदेचा अवमान नसून विशेषाधिकाराचे उल्लंघन देखील असल्याचा दावा खासदार दुबे यांनी केला आहे.
वकील अनंत यांनी 38 पानांचा विस्तृत अहवाल तयार केला असून यात महुआ यांचे प्रश्न कशाप्रकारे हिरानंदानी यांना लाभ मिळवून देत होते हे नमूद केले आहे. एकप्रकारे हिरानंदानी यांचे हित साधण्यासाठी महुआ मोइत्रा या संसदेत प्रश्न विचारून अप्रत्यक्ष स्वरुपात सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होत्या असा आरोप आहे.









