फोर्ब्सची 2023 ची यादी सादर : यादीत सावित्री जिंदाल, रोशनी नादर मल्होत्रा, रेखा झुनझुनवाला, फाल्गुनी नायर, किरण मजुमदार शॉ यांचा समावेश
नवी दिल्ली :
देशातील प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे भारतातील व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? अलीकडेच, फोर्ब्सने 2023 वर्षातील अब्जाधीशांची यादी (फोर्ब्सच्या अब्जाधीशांची यादी 2023) प्रसिद्ध केली आहे. यामध्ये आता भारतातील सर्वात श्रीमंत 5 महिलाही सामील झाल्या आहेत, पाहुया कोण आहेत त्या.
फोर्ब्सच्या या यादीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ते जगातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. त्याचबरोबर गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 24 व्या स्थानावर घसरले आहेत. यासोबतच सावित्री जिंदालनंतर देशातील टॉप अब्जाधीश महिलांच्या यादीत रोशनी नादर मल्होत्रा, रेखा झुनझुनवाला, फाल्गुनी नायर, किरण मजुमदार शॉ यांची नावे आहेत.
1.सावित्री जिंदाल
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांनी बाजी मारली आहे. सावित्री जिंदाल या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्या सहाव्या तर महिलांच्या यादीत पहिल्या स्थानावर राहिल्या आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत जिंदाल 94 व्या क्रमांकावर आहेत. 73 वर्षीय सावित्री यांची एकूण संपत्ती 17 अब्ज डॉलर (रु. 13,91,31,82,50,000) आहे.
त्यांच्या विषयी अधिकची माहिती जाणून घेत असताना त्या कधीच कॉलेजमध्ये गेलेल्या नव्हत्या, हे समजले. 1970 मध्ये त्यांनी जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओमप्रकाश जिंदाल यांच्याशी लग्न केले. पतीच्या निधनापासून त्या हा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

2.रोशनी मल्होत्रा
श्रीमंत महिलांमध्ये पहिल्या पाचमध्ये रोशनी नादर मल्होत्रा यांचा समावेश राहिला आहे. मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या प्रमुख श्रीमंत महिलांच्या अहवालानुसार, रोशनी नाडरची एकूण संपत्ती 84,330 कोटी रुपयांची आहे. रोशनी नाडर या एचसीएलच्या अध्यक्षा आहेत. रोशनीचे वडील शिव नाडर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

3.रेखा झुनझुनवाला
बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची ओळख जगप्रसिद्ध राहिली आहे. ते शेअर बाजारातील एक दिग्गज गुंतवणूकदार होते. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या देशातील टॉप-5 श्रीमंत महिलांमध्ये सामील आहेत. रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर्स (47,650.76 कोटी रुपये ) इतकी आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँडचा समावेश आहे.

4.फाल्गुनी नायर
फाल्गुनी नायर या सौंदर्य उत्पादन उद्योगात कार्यरत आहेत. नायकाच्या संस्थापक आहेत. नायर यांची कंपनीतील हिस्सेदारी समान आहे. देशातील टॉप अब्जाधीश महिलांमध्ये नायर यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर्स ( 22,192 कोटी रुपये) इतकी आहे. नायर यांनी 2012 मध्ये नायकाची स्थापना केली. या कंपनीकडे 1500 हून अधिक ब्रँड्सचा पोर्टफोलिओ आहे.

5.किरण मजुमदार शॉ
देशातील टॉप अब्जाधीश महिलांच्या यादीत किरण मुझुमदार शॉ यांचेही नाव आहे. शॉ या बायोकॉनच्या अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2 अब्ज डॉलर्स (16,438 कोटी रुपये) इतकी आहे. शॉ यांनी 1978 मध्ये बायोकॉनची सुरूवात केली आहे.









