गोदगेरी-खानापूर बसची फेरी बस्तवाड गावावरुन येणार, बसचे जल्लोषी स्वागत
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात वसली आहेत. काही गावांना अद्यापही पक्के रस्ते नाहीत. डोंगराळ भाग असल्याने रस्ता बनविणे कठीण बनले आहे. तर काहीवेळा प्रवाशांचा अभाव असल्याचे कारण पुढे केल्याने अनेक गावांना बस जात नाहीत. बस्तवाड गाव त्यापैकीच एक होय. परंतु या गावाला पक्का रस्ता झाल्याने गावात बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार सोमवार दि. 31 रोजी नागरगाळी ग्रा. पं. सदस्य सुनिल प्रभू यांच्या नेतृत्वाखाली खानापूर बस आगाराच्या प्रमुखांना यासंबंधी निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार बसआगार प्रमुख महेश तिरकन्नावर यांनी खानापूर-गोदगेरी बस बस्तवाडहून सुरू केली आहे. मंगळवार दि. 1 रोजी गोदगेरीहून पहाटे सुटलेली बस सकाळी 6.30 वा. नागरगाळीमार्गे बस्तवाड गावात आली. त्यावेळी ग्रामस्थांनी बसचे स्वागत करून पूजन करण्यात आले. बसचालक व वाहकाचा ग्रामस्थांतर्फे शाल, श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी नागरगाळी ग्रा. पं. सदस्य सुनिल प्रभू, उपाध्यक्षा नाजीमा पाटील, बस्तवाड गावातील पंच अशोक गुरव, याकूब पाटील, विठ्ठल बेकवाडकर, विठ्ठल गुरव, मारुती कंग्राळकर, नागेंद्र बेकवाडकर, शटवाप्पा गुरव आदींसह महिला व नागरिक उपस्थित होते. या बससेवेमुळे विद्यार्थीवर्गांची व नागरिकांची सोय झाली आहे.









