माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर आता वऊण तेज या अभिनेत्याच्या चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. हा अॅक्शनपट असून याची कहाणी संरक्षण दलावर आधारित असल्याचे समजते. मानुषीने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे स्वत:ची व्यक्तिरेखा आणि चित्रपटाच्या तयारीसंबंधी झलक दाखविली आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्सकडून केली जाणार आहे. मानुषीने मागील वर्षी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. मानुषीने यात राजकुमारी संयोगिता ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत होता.

मानुषी याचबरोबर जॉन अब्राहमसोबत ‘तेहरान’ या चित्रपटात दिसून येणार आहे. तेलगू चित्रपटात मी एका रडार अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या अॅक्शनपटात सामील होता आल्याने आनंदी आहे. दिग्दर्शक शक्ती प्रतात सिंह यांची मी आभारी आहे. भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांविषयी जाणून घेण्यासाठी मी उत्सुक असून वरुणसोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी ठरणार असल्याचे मानुषीने म्हटले आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्सने यापूर्वी ‘मेजर’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर बेतलेला होता. तर मानुषीचा तेलगू चित्रपट हा सत्यघटनेवर आधारित असल्याचे समजते. या चित्रपटाद्वारे शक्ति प्रताप सिंह दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. चित्रपटाची कहाणी शक्ति प्रताप सिंह, आमिर खान आणि सिद्धार्थ राज कुमार यांनी लिहिली आहे. हा चित्रपट तेलगूसह हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
वरुण तेज हा तेलगू अभिनेता आणि निर्माता नागेंद्र बाबू यांचा पुत्र आहे. चिरंजीवी आणि पवन कल्याण हे त्याचे काका आहेत. वरुणने 2000 साली बाल कलाकार म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तर 2014 साली ‘मुकुंद’ या चित्रपटात त्याने नायकाची भूमिका साकारली होती.









