प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ासह शहर व आसपासच्या भागात मंगळवारी 7 मार्च रोजी सोसाटय़ाच्या वाऱयासह वातावरण ढगाळ राहिले. हवामान विभागाच्यावतीने कोकणात सोसाटय़ाच्या वाऱयासह पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र ऐन आंबा हंगामात ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. कोकणासह रत्नागिरीचे प्रमुख पीक असलेल्या आंब्याला अनुकूल वातावरणाची गरज असते. वातावरणात होणाऱया बदलांमुळे आंब्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तर काही ठिकाणी तयार मोहर गळून पडतो. दरम्यान हवामान विभागाच्यावतीने 8 ते 11 मार्चंदरम्यान हवामान कोरडे राहणार असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात उतार-चढाव पहायला मिळत आहेत. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी वाढलेल्या तापमानामुळे आंब्याला सनबर्नचा धोका निर्माण झाला होता तर काही ठिकाणी फळही गळून पडले. वातावरणात असलेल्या अस्थिरतेमुळे कधी कडाक्याचे ऊन तर कधी ढगाळ वातावरण व पावसाचे सावट असे मिश्र स्वरुपाचे वातावरण पहायला मिळते आहे. जर ढगाळ वातावरण सलग राहिले तर पुढील काही दिवसांत तयार होणाऱया आंब्यावर परिणाम होऊ शकतो. हवामान विभागाने हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला असला तरी पुढील काही दिवसात तापमानात वाढ झाल्यास सनबर्नचा धोका संभवू शकतो.
खेडमध्ये पावसाचा शिडकावा
खेड : तालुक्यातील भडगाव, चाकाळे, खोंडे आदी गावांमध्ये तुरळक पाऊस पडला. राज्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज 4 दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी तुरळक पावसाची नोंद झाली. शेतातील तुरी, पावटा आदी कडधान्याचे पीक कापून उन्हात सुकत ठेवण्यात आले होते. या सुकवत ठेवलेल्या कडधान्यावर तुरळक पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस व वाऱ्यामुळे बहुतांशी मोहोर गळून पडल्याने आंबा व काजू बागायतदारही चिंतेत पडले आहेत. पावसामुळे येथील रस्ते भिजून निसरडे बनले होते.
दापोलीत ढगाळ वातावरण अन् वेगवान वारे
मौजेदापोली: गेल्या 2 दिवसांपासून दापोलीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून वेगवान वारेही वहात आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांप्रमाणे प्रवाहित होणाऱ्या वाऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तसेच बागायतींमध्ये आंबा, काजूला आलेले मोहोर गळून पडत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी मध्यरात्री विजा, गडगडाट सुरू झाला होता. तसेच पूर्वेकडून वेगवान वारे वहात होते. मंगळवारी पहाटेपर्यंत हे वारे वहात होते. तसेच काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. 8 तारखेपर्यंत हवामान विभागाने ढगाळ वातावरण तसेच पावसाची शक्यता वर्तवली आहे. या वेगवान वाऱ्यांमुळे वाटाण्याच्या आकाराची कैरी तसेच मोहोर गळून पडत असल्याचेही काही ग्रामस्थांनी सांगितले. दापोलीत अजूनही आंब्याच्या झाडांना मोहोर येत आहे तर काही आंब्याच्या झाडांना वाटाण्याच्या आकाराची कैरी तयार होत आहे. यात निसर्गाच्या प्रकोपामुळे नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती ग्रामस्थ व बागायतदारात दिसत आहे.









