चीनचा आरोप ः भारतासोबत नव्या ‘नाटो’ची तयारी
वृत्तसंस्था / बीजिंग
चीनचे विदेशमंत्री किन गँग यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेने चीनबद्दलचे स्वतःचे खराब वर्तन बदलावे, अन्यथा दोन्ही देशांमधील वाद वाढू शकतो. चीनला चिरडून अमेरिका कधीच पुढे जाऊ शकत नाही. अमेरिपेच्या कारवायांमुळे चीनचा विकास थांबणार नसल्याचा दावा गँग यांनी केला आहे.
संसदेतील बैठकीनंतर विदेशमंत्री म्हणून स्वतःच्या पहिल्या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित केले आहे. हिंद-प्रशांत व्यूहनीति अमेरिकेचे सुरक्षा आणि विकास विषयक धोरण दर्शविते, परंतु अमेरिका प्रत्यत्रात आशिया दुसरा नाटो निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेचा हा प्रयत्न निश्चितपणे अयशस्वी ठरणार असल्याचे चीनच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.
अमेरिका आम्हाला स्वतःचा सर्वात मोठा शत्रू आणि जागतिक राजकारणात सर्वात मोठे आव्हान मानतो, परंतु अमेरिकेची ही मानसिकता पूर्णपणे चुकीची आहे. चीनसोबत युद्ध न करायचे नसून संबंध वृद्धींगत करणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात येते. परंतु याचा खरा अर्थ अपमान किंवा हल्ला झाल्यावरही आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ नये असा असतो. चीनबाबत हे शक्य नाही. अमेरिकेने स्वतःचे वर्तन न बदलल्यास कुठलेही विधान स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखू शकणार नसल्याचा इशारा गँग यांनी दिला आहे.
रशियासोबतचे संबंध दृढ करणार
अमेरिका स्वतः तैवानला शस्त्रास्त्रs पुरवत आहे, अशा स्थितीत चीनकडून रशियाला शस्त्रास्त्रपुरवठा करण्यात आल्यास प्रश्न विचारण्याचा अधिकार अमेरिकेला नाही. जगात वाढते विवाद पाहता चीनला रशियासोबतचे संबंध मजबूत करावे लागणार आहेत. अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यातील चर्चा या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलल्याचे गँग यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची उपाशी लांडग्याशी तुलना
सुमारे 2 तास चाललेल्या पत्रकार परिषदेत किन गँग यांनी वोल्फ वॉरियर डिप्लोमसीचा उल्लेख केला. जेव्हा लांडगे रस्ता रोखू पाहत असतील आणि उपाशी लांडगे तुमच्यावर हल्ला करत असतील तेव्हा चिनी मुत्सद्दय़ांना कोणत्याही स्थितीत स्वतःच्या देशाचे रक्षण करावे लागणार आहे. एक प्रतिस्पर्धी लक्ष्याऐवजी दुसऱयाला पाडण्यावर लक्ष केंद्रीत करणार असेल तर ती निष्पक्ष प्रतिस्पर्धा ठरत नसल्याचे चीनच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.









