कॉकपिटमध्ये आग लागल्याने दुर्घना ः दोघेजण होरपळले
@ वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या महिलेची मुलगी आणि वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. एका रुग्णालयात या दोघांवर उपचार केले जात आहेत.
ही दुर्घटना विमानाच्या कॉकपिटमध्ये आग लागल्याने घडली आहे. लाँग आयलँडनजीक हे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत 63 वर्षीय रोमा गुप्ता यांना जीव गमवावा लागला आहे.
दोन्ही महिला विमानोड्डाणाचे प्रशिक्षण घेत होत्या. विमान दुर्घटनेपूर्वी त्या प्रारंभिक प्रशिक्षणात सामील झाल्या होत्या. वैमानिक पूर्णपणे प्रशिक्षित होता, कॉकपिटमध्ये धूर दिसून येताच त्याने याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर उड्डाणापूर्वी विमानाची पूर्ण तपासणी करण्यात आली होती असा दावा विमानाच्या मालकाने केला आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाचे अधिकारी विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी वारंवार दुर्घटनास्थळाचा दौरा करत आहेत. दुर्घटनेचे कारण स्पष्ट होत नाही तोवर तपास सुरूच राहणार आहे.
दुर्घटनेतील पीडित गुप्ता कुटुंबाच्या मदतीसाठी लोकांनी ‘गो फंड मी’च्या अंतर्गत 50 लाख रुपये जमा केले आहेत. या रकमेतून जखमींवर उपचार केले जाणार आहेत. मृत महिलेच्या मुलीला दुर्घटनेमुळे गंभीर ईजा झाली असल्याने तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले.









