साहित्यिक अलका सिन्हा यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
स्त्रीला ईश्वराने रचनात्मक गुण दिला आहे. तिच्या साहित्यिक रचनेत तिच्या जीवनाची गोष्ट असते. दु:ख, पीडा, संघर्षाची साहित्यिक भाषा नसते. साहित्य हृदयाला स्पर्श करते, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिक अलका सिन्हा यांनी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे इन्स्टिट्यूट मिनेझिस सभागृहात बहुभाषिक महिला साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी दशरथ परब, सदस्य सचिव गोरख मांद्रेकर, समन्वयक कालिका बापट व आशा गेहलोत व सन्मानमूर्ती उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माया खरंगटे, अंजली आमोणकर, डॉ. वृषाली मांद्रेकर व डॉ. इजाबेल वाझ या साहित्यिकांचा त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
साहित्याची समीक्षा ही काळाची गरज आहे. जे लिहितो ते प्रामाणिकपणे,समर्पित वृत्तीने केले तर ते फळाला येते. आपल्या यशात इतरांचा वाटा आहे ही भावना महत्वाची असते, कारण इतरांपासून आपण प्रेरणा घेत असतो असे संचालक सगुण वेळीप यांनी यावेळी सांगितले.
यावेळी साहित्य समीक्षा काळाची गरज’ या विषयावर डॉ. वृषाली मांद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटचर्चेत लेखकांनी पूरक असे विचार मांडले. त्यातून गुण दोषांसह समतोल समीक्षा व्हायला हवी असा सूर व्यक्त झाला. प्रा. राजश्री सैल म्हणाल्या, कलाकृतीची योग्यता सांगणारी गुण दोषांसह समीक्षा होणे गरजेचे आहे. साहित्यकृतीकडे बघण्याचे वेगवेगळे आयाम समीक्षा देते. वाचकांची अभिऊची संपन्न करणे हे सुद्धा समीक्षकांचे काम असते. आजचे समीक्षक सुरक्षित वर्तुळात राहून समीक्षा करतात. कोकणीत चांगली समीक्षा जन्माला यायची आहे असेही त्यांनी नमूद केले. डॉ. ग्लेनिस मेंडोंसा म्हणाल्या, समीक्षा साहित्याचा दर्जा ठरवते. समीक्षकाला साहित्याची उत्तम जाण हवी. समीक्षा झालेले साहित्य वाचक उत्सुकतेने वाचतात, त्याचा अनुवादही होतो. योग्य समीक्षेद्वारे साहित्य कृतीतदडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकला पाहिजे.
डॉ. स्नेहा महांबरे यांनी सांगितले की, साहित्याची उंची वाढविण्यासाठी सहित्याची समीक्षा अत्यंत गरजेची आहे. आपल्याकडे समीक्षा ही बाहेरून आलेली नाही ती पुर्वापार आहे. साहित्यातील सौंदर्यस्थळे, मानदंड शोधणे समिक्षकाचे काम आहे. डॉ वृषाली मांद्रेकर म्हणाल्या, हिंदीत सुरवातीपासून समीक्षा चालत आली आहे व चांगली समीक्षा केली जात आहे. समीक्षा साहित्याला स्थापित व विस्थापितही करते. आज समीक्षा ही देवाण घेवाण तत्वावर केली जाते. चांगली समीक्षा लेखनाला दिशा देते, मार्गदर्शक ठरते. समीक्षा समतोल हवी, केवळ दोषांवर बोट ठेवणारी नसावी. गटचर्चेचे संचालन व संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. आशा गेहलोत यांनी केले.
दशरथ परब यांनी स्वागत केले. गायत्री पाटील हिने गायिलेल्या स्तवनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला डॉ. लता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. गोरख मांद्रेकर यांनी आभार मानले.
समारोपाला बहुभाषिक कविसंमेलन रंगले. यात अंकिता गावस व सारिका नाईक यांनी कोकणी, पौर्णिमा केरकर, प्रा.नीता तोरणे व राधा भावे यांनी मराठी, सिंधू असोलडेकर यांनी हिंदी तर प्रा.अदिती बर्वे यांनी इंग्रजी कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी अलका सिन्हा होत्या. मेरे पासपोर्ट के कागजपर लिखा नाम पर नही है मेरा देश, देश के भीतर मैं रहती हुं मैं और मेरे भीतर रहता है देश… या त्यांच्या ओळी थेट भिडल्या.









