कर्नाटकच्या निकालावर विजय सरदेसाई यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी/ मडगाव
कर्नाटक निवडणुकीच्या निकालांकडे आपण लोकशाहीचा विजय म्हणून पाहतो. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष व लोकशाही देशात जातीयवादी आणि फुटीरतावादी राजकारणाला कुठेही स्थान नाही हे जनतेचे ठाम विधान त्यातून दिसून आलेले आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
हे पाहणे आनंददायी आहे की, तारस्वरात प्रचार होऊनही कर्नाटकच्या सर्व घटकांमधील लोकांनी त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या वास्तविक मुद्यांना प्राधान्य दिले आणि विसंगती व मतभेदाचे राजकारण नाकारून सहकार्याच्या राजकारणाला पाठिंबा दिला. गोव्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जोरदार प्रचार करूनही कर्नाटकातील लोक संघर्षाचे राजकारण नाकारण्याच्या त्यांच्या संकल्पापासून परावृत्त झाले नाहीत. गोव्यात आपण जो धडा शिकला पाहिजे तो हा की, फुटीरतावादी आणि जातीयवादी राजकारणाला कुठेही लोकांचा पाठिंबा मिळणार नाही आणि लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे हे राजकारणाचे मूळ असले पाहिजे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. आम्ही काँग्रेसच्या गोवा विभागाकडे अशीही मागणी करतो की, त्यांनी कर्नाटकातील त्यांच्या नेत्यांना गोव्यातील लोकांच्या भावनांची तत्काळ दखल घेण्यास, त्यांच्या भावनांचा आदर करण्यास सांगावे आणि आधीच झालेले नुकसान भरून काढताना म्हादई गोव्यात परत आणण्यासाठी पावले उचलावीत. याबाबत तातडीने प्रगती करून म्हादई परत आणण्याची जबाबदारी आता गोव्यातील काँग्रेस नेतृत्वावर आहे. गोमंतकीयांच्या वतीने पुढील घडामोडी आणि भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष कोणती पावले उचलतात यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. आम्ही त्यांना सतत आठवण करून देऊ की, त्यांचे प्राथमिक कर्तव्य व निष्ठा ही गोव्याप्रती असली पाहिजे, इतर कोणत्याही राज्याप्रती नाही. काँग्रेस आणि भाजपने गोव्याला प्रथम स्थान दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे









