3 कोटीपर्यंतचे कर्ज देण्याची क्षमता
राष्ट्रीयकृत बँकांबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेल, पंरतु गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात मुले स्वत:ची बँक संचालित करत आहेत. 2009 मध्ये सुरू झालेल्या या बँकेशी आतापर्यंत 16,263 मुले जोडली गेली आहेत. बाल गोपाल बचत अँड धिराण (कर्ज) को-ऑपरेटिव्ह सोसायटी बँकेच्या यशामागे मोठे कारण अधिक व्याजदर आहे. या बँकेत पैसे जमा केल्यावर मुलांना चांगला व्याजदर मिळतो. यामुळे अधिकाधिक मुले बचतीसाठी प्रेरित होत आहेत. अधिक ठेवींमुळे बँकेकडे आता 4.82 कोटी ऊपयांची गंगाजळी आहे. यामुळे बँक तीन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकते.

बँकेचे कार्यस्वरुप
या को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अश्विन पटेल यांच्युनसार 18 वर्षांपर्यंतचा मुलगा किंवा मुलगी या बँकेत खाते उघडू शकतो. याकरता त्यांच्या आईवडिलांना 110 रुपयांची रक्कम सदस्यत्वासाठी जमा करावे लागतात. त्यानंतर त्यांना एक गुल्लक दिला जातो. यात मुले बचतीचे पैसे ठेवतात. लहान मुले घरी आलेल्या पाहुण्यांकडून मिळणारी रक्कम गुल्लकमध्ये ठेवतात. दर महिन्याला बँकेचा एक प्रतिनिधी पोहोचल्यावर गुल्लक उघडला जातो, त्यातील रक्कम घेत मुलांना एक पावती दिली जाते आणि ही रक्कम बँकेत जमा केली जाते. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलांना ही रक्कम काढता येते. या रकमेचा वापर शिक्षण, व्यापार आणि वाहनखरेदीसाठी करता येतो.
मध्यमवर्गातील मुलांचा सहभाग
या अनोख्या बँकेत खाते उघडणारी मुले प्रामुख्याने मध्यमवर्गातील आहेत. साबरकांठा आणि अरवल्ली जिल्ह्यातील 321 गावांमधील मुले या बँकेशी जोडली गेली आहेत. बँकेकडून मुलांना पैशांच्या बचतीसह वीज तसेच अन्य गोष्टींच्या बचतीसाठी प्रोत्साहित केले जाते. याचबरोबर धूम्रपानविरोधात जागऊक करण्यात येते.
50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज
मुलांची ही बँक सर्वसामान्य लोकांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते. हे कर्ज पशूखरेदी किंवा व्यवसायासाठी देण्यात येते. बँकेने मागील वर्षी 47.47 लाख रुपयांचा नफा मिळविला होता. बँकेच्या एकूण 16,263 खातेधारकांपैकी 3000 मुले आता प्रौढ झाली आहेत.









