प्रतिनिधी/ काणकोण
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काणकोण तालुक्याच्या सीमेला भिडून असलेल्या कारवार-अंकोला मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सतीश सैल हे निवडून आल्याने काणकोण मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच सैल यांचे नातेवाईक आणि समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष केला.
कारवारचे काँग्रेसचे उमेदवार सैल यांना पाठिंबा व्यक्त करताना काणकोणातील काँग्रेसच्या जनार्दन भंडारी आणि अन्य कार्यकर्त्यांनी सैल यांच्य रोड शोमध्ये भाग घेतला होता. भंडारी यांनी सैल यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, मतदार क्षणिक आमिषांना बळी पडत नाही आणि मतदार हाच लोकशाहीत सर्वश्रेष्ठ असल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. हळूहळू अन्य राज्यांत देखील परिवर्तन होण्याचे हे संकेत आहेत आणि कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी संघटितपणे काम केल्याचा हा परिणाम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कारवार प्रांतात मोठ्या प्रमाणात असलेल्या कोकणीभाषिकांनी यावेळी सैल यांच्या बाजूने मतदान केल्याचे दिसून आले आहे. माजी आमदार आनंद असनोटीकर यांनी सैल यांना पूर्ण पाठिंबा देताना सैल हे जिंकणे म्हणजे आपलाच विजय असल्याचे जाहीर केले होते. आम्ही दोघे मिळून कारवार-अंकोला मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असे त्यांनी आधीच घोषित करून प्रचारात भाग घेतला होता.
गोव्यातील भाजप नेत्यांना कर्नाटकातील मतदारांनी जागा दाखविली : भंडारी
दरम्यान, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यातून मुख्यमंत्र्यांसहित जे मंत्री आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी गेले होते त्यांना त्यांची जागा कर्नाटकातील मतदारांनी दाखविली आहे, अशा शब्दांत जनार्दन भंडारी यांनी भाजपवर शरसंधान केले आहे.









