सर्वसामान्यांना फटका : पुन्हा वाढण्याचे संकेत
बेळगाव : मागील काही दिवसांपासून वाढलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण होऊ लागली आहे. मात्र दुसरीकडे कांदा दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता टोमॅटोनंतर कांद्यासाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईने जनता हैराण झाली आहे. त्यातच आता कांदा दरात वाढ झाल्याने गृहिणी, व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. किरकोळ बाजारात टोमटो 120 किलो दराने विकला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना टोमॅटो खरेदी करणे अशक्य झाले होते. दरम्यान, काहींनी टोमॅटो ऐवजी चिंचेचा वापर केला होता. मात्र आता दरात काहीशी घट झाल्याने टोमॅटो खरेदी करणे सोयिस्कर होऊ लागले आहे. मात्र दुसरीकडे कांदा दरात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. डाळी, कडधान्य यासह किराणा मालाच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे असह्या होऊ लागले आहे. टोमॅटोबरोबर आता कांदा दराची त्यात भर पडली आहे. टोमॅटो दर आता 60 ऊपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून खरेदी होऊ लागली आहे. श्रावण तोंडावर आला आहे. त्यामुळे पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल वाढणार आहे. बाजारालादेखील बहर येऊ लागला आहे. मात्र आता दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढू लागली आहे.









