शिक्षकाच्या हत्येवर अध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया
वृत्तसंस्था/ पॅरिस
उत्तर फ्रान्सच्या अर्रास शहरातील एका शाळेत शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात 20 वर्षीय इसमाने एका शिक्षकाची चाकूने वार करत हत्या केली होती. या हल्ल्यात आणखी दोघेजण जखमी झाले आहेत. तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याच्या घटनेची निंदा केली आहे. अंतर्गत मंत्री गेराल्ड हर्मेनिन यांनी या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये हायअलर्ट देण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
फ्रान्स इस्लामिक ‘दहशतवादाच्या क्रौर्याने प्रभावित’ झाला असल्याचे उद्गार मॅक्रॉन यांनी काढले आहेत. या घटनेनंतर मॅक्रॉन यांनी संबंधित शाळेला भेट दिली आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येनंतर आता पुन्हा एकदा शाळेत दहशतवाद फैलावला आहे. हल्लेखोराने भ्याडपणे शिक्षकाची हत्या केली असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
अध्यक्षांनी यावेळी शिक्षक आणि दोन जखमी विद्यार्थ्यांसोबत अन्य एक शिक्षक तसेच शालेय कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे. या सर्वांनी हल्लेखोराचा मुकाबला केला होता. आम्ही एकत्रिपपणे अन् मजबूतीसह उभे आहोत असे वक्तव्य मॅक्रॉन यांनी केले आहे.
फ्रान्सच्या एका शाळेत 20 वर्षीय युवकाने फ्रेंच शिक्षक डोमिनिक बर्नार्ड यांची हत्या केली होती. आरोपी हा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. हल्ल्यादरम्यान आरोपी धार्मिक घोषणा देत होता अशी माहिती पोलीस अधिकारी स्लीमन हमजी यांनी दिली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी याला इस्लामिक दहशतवादाचा हल्ला ठरविले आहे. तर पोलिसांनी अन्य ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला आहे.
फ्रान्समधील सुरक्षेत वाढ
हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याला दहशतवादी हल्ला मानून तपास केला जात आहे. सुरक्षा इशारा उच्चस्तरापर्यंत वाढविण्यात आला आहे. याप्रकरणाचा संबंध पश्चिम आशियातील घडामोडींशी असल्याचे गृहमंत्री डर्मेनिन यांनी सांगितले आहे. पॅरिसपासून 185 किलोमीटर अतंरावरील अर्रास शहराच्या गॅम्बेटा शाळेत हा हल्ला झाला आहे. आरोपी तसेच त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा रशियाचा नागरिक आहे.









