वृत्तसंस्था /हैदराबाद
चिनी आभासी चलनाच्या 750 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी एनआयए या केंद्र सरकारच्या अन्वेषण संस्थेला दिली आहे. या घोटाळ्याचा तपास पोलिसांसह एनआयएही करीत आहे. काही चिनी कंपन्यांनी भारतात स्वस्त कर्जाचे आमिष दाखवून हा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याद्वारे भारतीयांचे पैसे एका आभासी चलनाच्या स्वरुपात काही इस्लामी दहशतवादी संघटनांच्या नावाने हस्तांतरीत करण्यात आले आहेत. हेझबुल्लाह नामक एका व्यक्तीच्या खात्यावर या पैशांची नोंद करण्यात आली आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे भारताच्या सीमेपलिकडे पोहचलेली असल्याने ही चौकशी एनआयएकडे सोपविण्यात आली आहे. हा घोटाळा गेल्या महिन्यात हैदराबाद पोलिसांनी उघडकीस आणला होता, अशी माहिती देण्यात आली.
घोटाळ्याचे स्वरुप
भारतातील काही नागरिकांना काही चिनी व्यक्तींनी अॅपच्या माध्यमातून स्वस्त कर्जाचे आश्वासन दिले होते. या नागरिकांकडून प्रारंभीची रक्कम म्हणून एकंदर 712 कोटी रुपये घेण्यात आले होते. पण नंतर त्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले गेले नाही. त्यांनी जमा केलेलाr प्रारंभीची रक्कमही परत देण्यात आली नाही. त्यामुळे हैदराबाद सायबर गुन्हा शाखेकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.
जटील तपास
या गुन्ह्यात तंत्रज्ञान अंतर्भूत असल्याने त्याचा तपास करणे जटील काम आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील काही महत्त्वाच्या व्यवहारांचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. इतर तपास हैदराबाद पोलीस करत आहेत. काही इस्लामी दहशतवादी संघटना या घोटाळ्यात समाविष्ट असल्याची माहिती देण्यात आली.









