वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नेपाळ अन् बांगलादेश या शेजारी देशांवरून भारतासमोर धर्मसंकटाची स्थिती आहे. भारताचे घनिष्ठ सहकारी मानल्या जाणाऱ्या दोन्ही देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षेत्रीय संचालकपदासाठी स्वत:चे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 9-10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेत या निवडणुकीसंबंधीही चर्चा होणार आहे. नेपाळ आणि बांगलादेशपैकी कुणा एकाची निवड करत त्याच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करणे भारतासाठी अवघड ठरणार आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या साइमा वाजेद या बांगलादेशच्या वतीने डब्ल्यूएचओ क्षेत्रीय संचालकपदाच्या उमेदवार आहेत. तर नेपाळच्या वतीने शंभू प्रसाद आचार्य हे उमेदवार असणार आहेत. शंभूप्रसाद हे डब्ल्यूएचओच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. डब्ल्यूएचओच्या दक्षिणपूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयाच्या संचालकपदासाठी नवी दिल्लीत एका बंद कक्षात निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान होणार असून विजयी उमेदवाराची घोषणा 11 सदस्य देशांच्या मतांच्या आधारावर केली जाणार आहे. बांगलादेश, भूतान, उत्तर कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि तिमोर-लेस्ते यांचा यात समावेश आहे. भारताच्या पूनम खेत्रपाल सिंह या 2014 पासून डब्ल्यूएचओ क्षेत्रीय कार्यालयाच्या संचालक आहेत.
कुणाला मतदान करणार भारत?
बांगलादेश आणि नेपाळ यापैकी कुणाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा याचा निर्णय भारताने अद्याप घेतलेला नाही. परंतु बांगलादेशी उमेदवाराचे पारडे जड असल्याचे संकेत आहेत. साइमा वाजेद या शेख हसीना यांच्या कन्या असल्याने आणि बांगलादेशात लवकरच निवडणूक होणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय भारताकडून घेतला जाऊ शकतो. नेपाळचे उमेदवार शंभू प्रसाद हे सध्या डब्ल्युएचओच्या जिनिव्हा मुख्यालयात तैनात आहेत. तर साइमा वाजेद या मनोवैज्ञानिक असून बांगलादेश सरकारमध्ये सल्लागार आहेत.
भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता
साइमा या स्वत:ची आई अन् बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात येणार आहेत. जी-20 च्या विशेष आमंत्रित देशांच्या यादीत बांगलादेशचे नाव देखील सामील आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख गेब्रियेसस देखील जी-20 बैठकीसाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत एक मोठे शिष्टमंडळ देखील दौऱ्यावर येत आहेत. क्षेत्रीय संचालक पदासाठी त्यांच्याकडून शंभू प्रसाद यांना समर्थन दिले जाणार असल्याचे मानले जात आहे. साइमा या सध्या आसियान परिषदेसाठी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत.









