एरिक्सन मोबिलिटीच्या अहवालामधून माहिती सादर : दुसऱ्या तिमाहीत 7 दशलक्ष नवीन मोबाईल ग्राहक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2023 च्या दुसऱ्या तिमाहीत भारतात 7 दशलक्ष नवीन मोबाईल ग्राहक जोडले गेले, जे जगातील सर्वाधिक आहेत. भारतानंतर चीन (50 लाख) आणि अमेरिकेत (30 लाख) आहेत. मात्र, भारतात मोबाइलचा वापर 70 टक्के आहे, तर चीनमध्ये 120 टक्के आहे. ग्लोबल मोबाइल सबक्रिप्शन प्रमाण 105 टक्के आहे अशी माहिती एरिक्सन मोबिलिटीच्या ऑगस्टच्या अहवालानुसार देण्यात आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात असेही म्हटले आहे की, 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक स्तरावर 5 जी सदस्यांची संख्या 17.5 कोटींनी वाढली आहे. भारतात 5जी नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारीत केले जात आहे आणि यामध्ये भारताचा मोठा वाटा असेल अशी अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर मोबाईल ग्राहकांची एकूण संख्या 8.3 अब्ज आहे, ज्यात या तिमाहीत 4 कोटींची निव्वळ भर पडली आहे. जागतिक स्तरावर विशेष मोबाइल ग्राहकांची संख्या 6.1 अब्ज आहे. या तिमाहीत मोबाईल ब्रॉडबँड सबक्रिप्शनमध्ये सुमारे 10 कोटींनी वाढ झाली असून, एकूण 7.4 अब्ज झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण मोबाइल सबक्रिप्शनपैकी 88 टक्के मोबाइल ब्रॉडबँडचा वाटा आहे.
जगभरात 5जी सदस्यांची विक्रमी संख्या
अहवालात म्हटले आहे की दुसऱ्या तिमाहीत जागतिक स्तरावर 5जी सबक्रिप्शन वाढून 1.3 अब्ज झाले आहेत. सुमारे 260 कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडरने व्यावसायिक 5जी सेवा सुरू केल्या आहेत.









