वनखात्यातील शहिदांना श्रद्धांजली : सरकारने वन विभागाला सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक
खानापूर : पोलीस तसेच इतर विभागाच्या तुलनेत वनखात्याकडे अतिशय तोकड्या सुविधा उपलब्ध असूनदेखील वनखाते आपली सेवा चोख बजावत आहे. त्यामुळे निसर्गाचे संरक्षण होत आहे. निसर्ग हा मानवासाठी अत्यंत वरदानदायक आहे. या निसर्गाचे संरक्षण वनखात्यातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून करत आहेत. सरकारने वन विभागाला सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. निसर्ग रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वनखात्यातील कर्मचाऱ्यांचे आम्ही कायम ऋणी आहोत. असे वक्तव्य जेएमएफसी न्यायाधीश विरेश हिरेमठ यांनी गुरुवारी वन विभागातर्फे शहीद दिन पाळून वनखात्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केले. यावेळी वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर तलवार, निवृत्त वन अधिकारी मल्लेशप्पा बेनकट्टी, एसीएफ सुनीता निंबरगी, आरएफओ श्रीकांत पाटील, वाय. पी. तेज, भीमगड अभयारण्याचे सय्यद नदाफ यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एसीएफ सुनीता निंबरगी यांनी प्रास्ताविकात वन विभागात सेवा करताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा गुन्हेगारांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या सन्मानार्थ 11 सप्टेंबर रोजी ‘शहीद दिन’ साजरा केला जातो.
1730 मध्ये जोधपूरच्या महाराजांनी त्यांच्या राजवाड्याच्या बांधकामासाठी हजारो झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या बिश्नोई समाजातील 363 लोकांना ठार मारले होते, त्या दिवसाची आठवण म्हणून वन विभागाने हा दिवस वन शहीद दिन म्हणून घोषित केला आहे. आज जंगलाच्या संरक्षणासाठी मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांनी जंगलाच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते, असे त्या म्हणाल्या. मान्यवरांनी आणि विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वन विभागात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या वनरक्षक एसआय बसरीकट्टी आणि शिमाओ रुजारियो यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. विभागीय वन अधिकारी श्रीकांत पाटील यांनी शहीद दिन सोहळ्dयामागील विभागाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. शहिदांच्या स्मरणात मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात वन विभागाच्या कणकुंबी, भीमगड, लोंढा आणि खानापूर विभागाचे विभागीय वन अधिकारी, उप-विभागीय वन अधिकारी, वनरक्षक, कर्मचारी आणि शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.









