खानापूर : शहर परिसरात अनेक घरांमध्ये दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. दीड दिवसाच्या गणरायाला बुधवारी दुपारनंतर भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा घोषणा देत, मलप्रभा नदीघाटावर गणरायांचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने विसर्जनास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. दीड दिवसाच्या गणपतीची प्रथा काही मोजक्याच घरात करण्यात येते. शहरात पाच दिवस, सात दिवस, 11 दिवसांचे गणपती मोठ्याप्रमाणात पुजवतात. बुधवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. बुधवारी दुपारपासून विसर्जनास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.
सर्वत्र भक्तिमय वातावरण
शहरासह तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण असून घरोघरी गोडधोड पदार्थाची रेलचेल सुरू आहे. तर बुधवारी उंदरीनिमित्त तालुक्यातील मराठीबहूल गावांतून मांसाहाराच्या बेताचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी बकरी मारण्यात आली असून शहरातील मटण दुकानात सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसून येत होती. गणेशोत्सवाच्या निमित्त ग्रामीण भागात तसेच शहरात सर्वत्र गणरायाची आरती तसेच भक्तीगीते ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक मंडपात सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत भक्तीगीतांचा आवाज गुंजत आहे. रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात भक्तीपूर्ण वातावरणात आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. पुढील आठ दिवस वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन गणपती उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र विद्युतरोषणाईने परिसर झगमगून जात आहे. या गणपती उत्सवामुळे शहरासह तालुक्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात विविध ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे.









