जानेवारी-मे दरम्यानची आकडेवारी सादर : अर्थव्यवस्थेला मिळतेय बळकटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलीकडच्या महिन्यांमध्ये देशातील विमान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वर्षाच्या आधारावर पाहता 36 टक्के वाढ झाली आहे. वाढत्या विमान प्रवाशांच्या संख्येचा फायदा इंडिगो, विस्तारा आणि एअर एशिया या कंपन्यांना उठवता आला आहे. जानेवारी ते मे 2023 च्या दरम्यानच्या कालावधीत या तीनही कंपन्यांनी बाजारातील वाटा वाढवण्यात पुढाकार घेतला आहे.
मंत्रालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी ते मे 2023 दरम्यान 636.07 लाख प्रवाशांनी देशांतर्गत विमानांमधून प्रवास केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत दुसरीकडे 467.37 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. या तुलनेत यंदा विमान प्रवाशांची संख्या 36 टक्के वाढली असल्याचे यावरुन स्पष्ट होते.
मेमध्ये किती जणांनी केला प्रवास
मे 2022 मध्ये 114.67 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता तर यावर्षी मे मध्ये प्रवाशांची संख्या 132.41 लाखवर (15 टक्के वाढीसह)पोहचली. एप्रिल 2023 च्या तुलनेत मेमध्ये प्रवशांच्या संख्येत 3.26 लाखने भर पडली आहे. जानेवारी ते मे पर्यंतच्या काळातील प्रवाशांची संख्या वाढीव पाहता हवाई क्षेत्राला गती घेण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे स्पष्ट होते आहे. देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या वाढणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचेच कार्य ठरते आहे.

मुंबई विमानतळावर प्रवासी संख्या 23 टक्के वाढली
मुंबई : अदानी समूहाकडे असणाऱ्या मुंबई विमान तळावरील प्रवासी संख्या मेमध्ये 23 टक्के वाढीसह 43 लाख 43 हजार 806 इतकी झाली आहे. हवाई वाहतूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे हे द्योतक आहे. मागच्या वर्षी मेमध्ये 35 लाख प्रवासी विमानतळावर नोंदले गेले होते. मुंबई विमानतळाचा इतर ठिकाणांशी उत्तम संपर्क असल्याने तसेच पायाभूत सुविधांमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानसेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढली. मे 2023 मध्ये 21 लाख 9607 प्रवासी विमानतळावर उतरले तर 22 लाख 34 हजार 199 प्रवाशांनी प्रयाण केले.









