वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया (स्पेन)
येथे सुरू असलेल्या पाच देशांच्या महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेल्जियमने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात बेल्जियमतर्फे अँबेरी बॅलेनगेनने 22 व्या मिनिटाला तर लुसी व्हर्सवेलने 37 व्या मिनिटाला गोल केले. भारतातर्फे वैष्णवी फाळकेने 56 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात स्पेनने भारतावर 3-2 अशी मात केली होती. भारताचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव असून त्यांचा पुढील सामना 19 डिसेंबरला जर्मनीबरोबर होणार आहे.









