वृत्तसंस्था/ कटक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे झालेल्या ओडीशा मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीशकुमार करुणाकरनने पुरूष एकेरीचे तर तनिषा क्रेस्टो व ध्रुव कपिला यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले.
पुरूष एकेरीच्या रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू सतीशकुमार करुणाकरनने आपल्याच देशाच्या आयुष शेट्टीचा 21-18, 19-21, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूरवरील सतीशकुमारचे हे पहिले विजेतेपद आहे.
मिश्र दुहेरीच्या खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या तनिष क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांनी सिंगापूरच्या टेरी व जेसिका यांचा 17-21, 21-19, 23-21 असा पराभव करत विजेतेपद हस्तगत केले. हा अंतिम सामना 75 मिनिटे चालला होता. मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सतिशकुमार करुणाकरनने आद्या वेरियात समवेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले होते.









