जी-20 देशांमध्ये अग्रस्थानी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हवामान बदल रोखण्यासाठीच्या कामगिरीच्या आधारावर भारताला जगातील पहिल्या 5 देशांमध्ये सामील करण्यात आले आहे. तसेच जी-20 देशांमध्ये भारताला पहिले स्थान देण्यात आले आहे. जर्मनीच्या ‘जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टीटय़ूट अँड क्लायमेट ऍक्शन नेटवर्क इंटरनॅशनल’कडून प्रकाशित हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताने मोठी झेप घेतली आहे. 2005 पासून हा निर्देशांक दरवर्षी जाहीर करण्यात येत आहे. 59 देश आणि युरोपीय महासंघाच्या हवामान संरक्षण कामगिरीवर या संस्थेकडून नजर ठेवली जाते.
हवामान बदल विषयक कामगिरीच्या आधारारव भारताला जगातील पहिल्या 5 देशांमध्ये तर जी-20 देशांमध्ये पहिले स्थान देण्यात आले आहे. डेन्मार्क, स्वीडन, चिली आणि मोरक्को यासारखे चार छोटे देश अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर राहिले आहेत. कुठल्याही देशाला पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान देण्यात आलेले नाही. याचमुळे सर्व मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये भारताची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.
महामारी आणि आर्थिक आर्थिक स्थितीनंतरही जागतिक हवामान बदलावर तोडगा काढण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दाखविण्यात आलेल्या नेतृत्वाचा परिपाक म्हणजे ही कामगिरी आहे. जागतिक स्तरावर भारताला मिळालेले हे स्थान अन्य कुठल्याही देशाच्यात तुलनेत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या कार्यक्रमांना भारत अत्यंत वेगाने लागू करत असल्याचे दर्शवित असल्याचे उद्गार केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांनी काढले आहेत.









