दुर्घटनेदिवशी 3165 तिकिटांचे वाटप ः चौकशी अहवालातून अनेक खुलासे
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातच्या मोरबी येथील पूल दुर्घटनेच्या चौकशीत दुरुस्ती अन् व्यवस्थापनातील चूक उघड झाली आहे. मोरबीमध्ये मागील महिन्यात झालेल्या पूल दुर्घटनेत 135 जणांना जीव गमवावा लागला होता. तपासात ओरेवा समूह आणि नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गंजलेली केबल, दुरुस्ती करण्यात न आलेले अँकर, सैल झालेले बोल्ट अन् अप्रशिक्षिक कर्मचारी या सर्व कारणांचा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) प्राथमिक तपासात खुलासा झाला आहे.
धातूच्या नव्या आच्छादनामुळे पूलाचे वजन वाढले. दुरुस्ती करणारे दोन्ही ठेकेदार पूलाची दुरुस्ती तसेच नुतनीकरण कार्य करण्यास पात्र नव्हते असे एफएसएलच्या अहवालात नमूद आहे. 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. यातील चार जण हे ओरेवा समुहाशी संबंधित आहेत. ओरेवा समूहच या ब्रिटिशकालीन झुलत्या पूलाचे व्यवस्थापन हाताळत होता.
पूलाच्या केबलला गंज चढला होता. जमिनीवर केबल जोडणाऱया अँकर पिन तुटल्या होत्या. तर अँकरवरील बोल्ट सैल झाले होते. समुहाने 30 ऑक्टेबर रोजी 3,165 तिकिटांची विक्री केली होती आणि पूलाच्या दोन्ही बाजूला तिकीट बुकिंग कार्यालयांदरम्यान कुठलाच समन्वय नव्हता असे समोर आले आहे.
सुरक्षा रक्षकांना पूलावर किती लोकांना जाऊ दिले जावे याची माहिती देण्यात आली नव्हती. दुर्घटनेच्या स्थितीत लोकांना वाचविण्यासाठी कुठलाच लाइफगार्ड किंवा नौकेची व्यवस्था करण्यात आली नव्हती. करारानुसार हा पूल 8-12 महिन्यांपर्यंत बंद ठेवणे आवश्यक होते. परंतु स्थानिक नगरपालिकेने कुठले फिटनेस प्रमाणपत्र न देता 7 महिन्यांनी हा पूल पुन्हा खुला केला होता.









