सकाळ-सायंकाळच्या वेळी गर्दी : महिला, तरुणांचा अमाप उत्साह : काही ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिराने

किणये/बेळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण मतदार संघात बुधवारी शांततेत आणि चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. प्रारंभी प्रक्रिया थोडी संथगतीने सुरू होती. सकाळी 8 ते 9 वाजल्यानंतर वेग वाढला होता. सकाळपासूनच महिला, पुऊष आणि तरुणांची मतदान केंद्रांवर वर्दळ वाढली होती. विशेषत: तिरंगी लढत असलेल्या ग्रामीण मतदार संघात मतदारांचा अमाप उत्साह दिसून आला. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत गर्दी कायम होती. काही भागात सकाळी तर काही भागांत सायंकाळच्या वेळेत गर्दी झाली होती. दुपारच्या वेळेत काही ठिकाणी शुकशुकाटही पाहायला मिळाला. विशेषत: नवतरुण मतदारांसह वृद्ध, दिव्यांग आणि रुग्णांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. शिवाय बुधवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात काहींनी मतदानाला पसंती दिली. त्यामुळे सकाळच्या सत्रातही ग्रामीण भागात मतदारांची लगबग पहायला मिळाली. बुधवारी सकाळी मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. रिक्षा व इतर वाहनांनी तसेच खासगी टेम्पो, कारगाडी व दुचाकीवरून कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी आणतानाचे चित्र पहावयास मिळाले. कंग्राळी खुर्द येथे सकाळी 9.30 च्या दरम्यान बुथ क्रमांक 37 वर 137 जणांनी मतदान केले होते. तसेच बुथ क्रमांक 43 वर 580 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कंग्राळी खुर्द गावात एकूण 13 मतदान केंद्रे आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मतदानासाठी गर्दी झाली होती.

हिंडलगा गावात सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास संथगतीने मतदान सुरू होते. मतदान केंद्रांवर दिव्यांग व वयोवृद्धांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. येथील चार मतदान केंद्रांवर 10.45 पर्यंत 668 इतके मतदान झाले होते. सुळगा (हिं.) गावात एकूण पाच मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी सकाळी 11 वाजेपर्यंत 941 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. उचगावमध्ये अगदी शांततेने मतदान सुरू होते. 18 क्रमांक मतदान केंद्रांवर 264 तर 19 क्रमांक मतदान केंद्रांवर 280 मतदारांनी सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान पेले होते. तुरमुरी गावातील मतदान केंद्रांवर दुपारी 12 च्या दरम्यान महिलांची अधिक प्रमाणात गर्दी दिसून आली. सकाळी महिलांनी आपापल्या घरातील स्वयंपाक व घरची कामे आटोपून आम्ही आता मतदान करण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. तुरमुरी येथील 75 वॉर्ड क्रमांकमध्ये 254 जणांनी तर 76 क्रमांक केंद्रांवर 274 व 77 मतदान केंद्रांवर 300 मतदारांनी दुपारी 12 पर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तालुक्याच्या पश्चिम भागातील कुद्रेमनी गावात अगदी चुरशीने मतदान सुरू होते. बुथ क्रमांक 91 मध्ये 553 जणांनी, बुथ क्रमांक 92 मध्ये 663 जणांनी, बुथ क्रमांक 93 मध्ये 496 जणांनी दुपारी 12.30 पर्यंत मतदान केले होते. सायंकाळी पुन्हा मतदानाचा टक्का वाढणार अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यळेबैल गावात 103 बुथवर 640 जणांनी दुपारी 12.45 वाजेपर्यंत मतदान केले होते. राकसकोप येथे बुथ क्रमांक 104 वर 936 पैकी 410 जणांनी 1 वाजेपर्यंत मतदान केले होते. सोनोली गावात मतदान केंद्र 102 वर 445, 101 केंद्रांवर 485 इतके मतदान दुपारी 1.10 वाजण्याच्या सुमारास झाले होते.

प्रशिक्षणाचा अभाव
मतदान केंद्रांवर आलेल्या काही कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव दिसून आला. त्यामुळे बेकिनकेरे व अन्य काही ठिकाणी 7 ऐवजी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुऊवात झाली. त्यामुळे सकाळी 7 वाजता आलेल्या मतदारांना ताटकळत थांबावे लागले. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि इतर यंत्रसामग्री हाताळण्यात अधिकारी कुचकामी ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला उशीराने सुऊवात झाली.

मतदान केलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल
नवमतदार आणि काही तरुणांनी स्वत: मतदान केलेली छायाचित्रे सकाळपासूनच व्हायरल केली होती. विशेषत: तरुण पिढी नवमतदार यात आघाडीवर असल्याचे दिसून आले. स्वत: मतदान केलेले हाताचे बोट सोशल मीडियावर अपलोड करत होते. त्यामुळे दिवसभरात मतदान केलेल्या तरुणांची छायाचित्रे झळकत राहिली.

बेकिनकेरेत चुरशीने
बेकिनकेरे येथे रविवारी चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 947 पैकी 726, वॉर्ड क्रमांक 4 मध्ये 529 पैकी 403 तर वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 1102 पैकी 913 जणांचे मतदान झाले. एकूण 2039 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अतिवाड येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 1390 पैकी 1135 मतदारांनी मतदान केले. दोन्ही गावांमध्ये सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मतदानासाठी गर्दी झाली होती.

कामगारवर्गाची सकाळच्या सत्रात पसंती
नोकरदार, कामगार आणि इतर कामांसाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदानाला पसंती दिली. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर कामगारांची वर्दळ पहायला मिळाली. काहींनी स्वत:ची कामे आटोपून सायंकाळच्या सत्रात मतदान करण्यावर भर दिला. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली.
मतदान प्रक्रिया काही ठिकाणी संथगतीने

ग्रामीण भागातील काही भागात मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू होती. त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागत होते. व्हीव्हीपॅट, ईव्हीएम यंत्रांचे काम संथगतीने झाल्याने काही ठिकाणी रांगादेखील लागल्या होत्या. त्यामुळे मतदारांनी प्रशासनाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
बेळगुंदीत दुपारी मतदानासाठी महिलांची गर्दी

बेळगुंदी गावातील प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर दुपारी महिलांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. एकूण चार मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 10 पर्यंत बुथ क्रमांक 97 वर 138 मतदान, बुथ क्रमांक 98 वर 166 मतदान, बुथ क्रमांक 99 वर 207 मतदान, बुथ क्रमांक 100 वर 191 मतदान झाले होते. तसेच बुथ क्रमांक 97 मध्ये 318 मतदान, बुथ क्रमांक 98 मध्ये 400, बुथ क्रमांक 99 वर 484 तसेच बुथ क्रमांक 100 वर 400 मतदान झाले होते, असे दुपारी 1.15 पर्यंत 1602 मतदारांनी मतदान केले होते. मागील महिन्याभरापासून ग्रामीण मतदार संघात चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे मतदारांनीदेखील मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला आहे. यासाठी कार्यकर्त्यांनीही विविध सुविधा पुरविल्याने मतदानाचा आकडा गतवेळेपेक्षा वाढला आहे. दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी व्हिलचेअर आणि अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिकेची व्यवस्था करण्यात आली होती. 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी बॅलेट पेपरद्वारे घरबसल्या मतदान प्रक्रियाही यापूर्वी पार पडली आहे. बेनकनहळ्ळी येथील बुथ क्रमांक 79 मध्ये 516 मतदान, बुथ क्रमांक 80 मध्ये 465 मतदान, बुथ क्रमांक 81 मध्ये 456 मतदान दुपारी 1.45 च्या दरम्यान झाले होते. सावगावमध्ये दुपारी 2 च्या दरम्यान महिलांची अधिक गर्दी दिसून आली. दुपारी 2 पर्यंत बुथ क्रमांक 95 मध्ये 536 जणांनी मतदान केले तर बुथ क्रमांक 94 मध्ये 496 जणांनी मतदान केले होते. सावगावमधील दोन मतदान केंद्रांमधील एका मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 7 पर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी निवडणूक आयोगानेही कंबर कसली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस, राखीव दलाचे जवान, अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या यांच्या सहकार्यानी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. पूर्व भागातील विविध गावांमध्ये दुपारनंतर सौम्य प्रमाणात मतदान सुरू होते. निलजीमध्ये मतदान केंद्र क्र. 209 या ठिकाणी 392 इतके मतदान व क्र. 210 बुथवर 786 इतके मतदान याचबरोबर क्र.211 मतदान केंद्रावर 491 मतदान व 212 मतदान केंद्रावर 427 इतके मतदान दुपारी 3.30 पर्यंत झाले होते. मुतगा गावातील मतदान केंद्रांवर दुपारी 4.45 वाजण्याच्या सुमारास शुकशुकाट होता. यातील काही मतदान करणाऱ्यांची गर्दी दिसून आली. बुथ क्र. 200 मध्ये 613, बुथ क्र. 201 वर 616, बुथ क्र. 202 वर 442, बुथ क्र. 203 वर 425, बुथ क्र. 204 वर 365, बुथ क्र. 205 वर 409, बुथ क्र. 208 मध्ये 433 इतके दुपारी 4.45 पर्यंत झाले होते. हलगा येथे 235 बुथ क्रमांकवर 606 मतदान व 234 मतदान केंद्रांवर 430 जणांनी दुपारी 4 पर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता. हलगा गावात एकूण 5 हजार 679 पैकी 4 हजार 874 इतके मतदान झाले. मण्णूर गावातील बुथ क्र. 17 मध्ये 583, बुथ क्र. 16 मध्ये 670, बुथ क्र. 15 मध्ये 379, बुथ क्र. 14 मध्ये 770 जणांनी मतदान सायंकाळी 5.30 पर्यंत केले होते. तर उर्वरित काही मतदार मतदान करण्यासाठी येत होते.
बस्तवाड (ह) मध्ये 82 टक्के मतदान
बस्तवाड (ह.) गावात 4.30 च्यादरम्यान मतदान केंद्रांवर महिला व तरुणांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळच्या सत्रात वयोवृद्ध व दिव्यांगांना आणून मतदान करण्यासाठी सहकार्य केले, असे काही तरुणांनी सांगितले. बस्तवाडमध्ये 244 केंद्रावर 640, 243 केंद्रावर 606, 242 केंद्रावर 851, 241 केंद्रावर 338 व 240 मतदान केंद्रावर 377 जणांनी दुपारी 4.30 पर्यंत मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी 6.30 पर्यंत बस्तवाडमध्ये 5 हजार 257 पैकी 4 हजार 292 इतके मतदान झाले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील जानेवाडी गावात एकूण 383 पैकी 348 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे गावचे 90 टक्के मतदान झाले आहे. किणये गावात एकूण 85 टक्के मतदान झाले. 1812 पैकी 1535 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. इनामबडस येथे 86 टक्के मतदान झाले. कर्ले गावात एकूण 1045 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बहाद्दरवाडी येथे 1014 पैकी 929 मतदारांनी मतदान केले. मंडोळी येथे एकूण 2310 पैकी 2 हजार 87 इतके मतदान झाले. नावगे गावात 1045 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. संतिबस्तवाड गावच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 927, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 698, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 690, वॉर्ड क्रमांक 4 मध्ये 675, वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 539 असे एकूण 3 हजार 529 जणांनी मतदान केले आहे. राजहंसगड येथे 1148 मतदारांनी मतदान केले.









