नगरसेवक वैशाली भातकांडे – परिसरातील नागरिकांची मागणी
बेळगाव : अंबाभवनच्या मागील बाजुस असलेल्या पाटील मळा येथील नाल्याची एक भिंत उभारण्यात आली आहे. मात्र अजूनही दुसरी भिंत उभे करण्यात आली नाही. त्यामुळे हा परिसर धोकादायक असून तातडीने अर्धवट असलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी वार्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी केली आहे. माजी आमदार अनिल बेनके यांच्याकडे पाठपुरावा करून नाल्याला दोन्ही बाजुने भिंत उभारण्यासाठी निधी मंजूर करून घेतला होता. मागीलवर्षी पावसाळ्यात या नाल्याचे पाणी शिरुन 18 घरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे माजी आमदारांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने हा निधी मंजूर केला होता. सध्या या कामाला सुरुवात झाली आहे. एका बाजुची भिंत उभारली आहे. तर दुसऱ्या बाजुची भिंत अजूनही उभारलेली नाही. याबाबत कंत्राटदाराला सूचना केल्या असता केवळ आश्वासन देत आहे. तेंव्हा तातडीने संबंधित कंत्राटदाराला सूचना करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे केली आहे. याबाबत लवकरच पाऊल उचलू, असे आश्वासन त्यांनी दिले.









