कृषी अधिकाऱ्यांची कारवाई : खतविक्री केंद्रावर धाड : जादा दराने खतविक्री केल्याचे निदर्शनास : तालुक्यात खळबळ, संस्थाचालकांचे धाबे दणाणले
खानापूर : नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या खतविक्री केंद्रात जादा दराने खतविक्री करून शेतकऱ्याची आर्थिक लूट करण्यात येत असल्याची तक्रार जून 27 तारखेला करण्यात आली होती. याची दखल घेऊन कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी खतविक्री केंद्रावर धाड टाकून तपासणी केली असता यात जादा दराने खतविक्री केल्याचे निदर्शनास आले होते. याची सखोल चौकशी करून त्यांनी या खतविक्री केंद्राचा परवाना तात्पुरता रद्द केला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून खतविक्री दुकानदारांचे तसेच संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या नंदगड येथील मुख्य कार्यालयाच्या शेजारी खतविक्री केंद्र आहे. या ठिकाणी शेतकऱ्यानां माफक दरात युरिया व इतर खते देण्यात येतात. या ठिकाणी युरिया आणि 10.26.26 ही खते चढ्याभावाने विक्री करण्यात येत असल्याची तक्रार कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. याची दखल घेऊन आपल्या अधिकारी व पथकासह या ठिकाणी धाड टाकून व्यवहाराची सखोल चौकशी केली होती. यात चढ्याभावाने खतविक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी त्यांनी चढ्यादराने खतविक्री करण्यात येऊ नये, तसेच खतविक्री करताना रितसर छापील बिले देण्यात यावीत, अशी लेखी नोटीस देण्यात आली. पुन्हा तक्रार आल्यास विक्री केंद्रावर रितसर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला होता.
कारवाईमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ
तालुक्यातील कुठल्याही खत दुकानातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्यात येऊ नये, तशी तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. नंदगड येथील मार्केटिंग सोसायटी ही तालुक्यातील एकदम जुनी सहकारी संस्था म्हणून तिची ओळख आहे. या संस्थेत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार होत असल्याने या संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसही आता आक्रमक झाली असून आपली भूमिका बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी सांगितले आहे.
आर्थिक लुटीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीचे म. ए. समितीकडून निवेदन
ज्या शेतकऱ्यांकडून अधिक रक्कम घेण्यात आली होती. ती रक्कम पुन्हा शेतकऱ्यांना परत देण्याचे आदेश देण्यात आले होते. ती रक्कमही शेतकऱ्यांना मार्केटिंग सोसायटीकडून परत देण्यात आली होती. याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने 30 जून रोजी लेखी निवेदन देवून या आर्थिक लुटीची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसेच नुकताच तालुका दौऱ्यावर आलेले जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांच्याकडे माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या गैरव्यवहाराची चौकशी योग्यपद्धतीने होत नसून अधिकारी संस्था चालकांना पाठीशी घालत असल्याची तक्रार जिल्हा पालकमंत्र्याकडे केली होती. याबाबतची कृषी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरुच होती. चौकशीअंती कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी मार्केटिंग सोसायटीच्या खतविक्री केंद्राचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.









