मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अंगणवाडी रिक्त पदे भरण्यासाठी जाचक अटी
बेळगाव : अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांच्या रिक्त असणाऱ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र यासाठी कन्नड प्रथम भाषेची अट घालण्यात आली आहे. ही अट जाचक आहे. यामुळे मराठी भागातील उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करणे कठीण झाले आहे. सदर अट रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणे या पदांसाठी इच्छुक उमेदवारांची नियुक्त करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तालुक्यामध्ये बहुतांश नागरिक मराठी भाषिक आहेत. त्यांची मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतूनच शिक्षण घ्यावे लागते. बहुतांश नागरिक मराठी शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे तृतीय भाषा कन्नड आहे, असे असताना सरकारकडून अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांच्या पदांसाठी प्रथम भाषा कन्नडची घातलेली अट जाचक आहे. यामुळे या रिक्त पदासाठी उमेदवारांना अर्ज करणे अशक्य झाले आहे.
राज्यात सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वांना समान संधी आहे. घटनेने अधिकार दिले आहेत, असे असताना राज्य सरकारकडून प्रथम भाषा कन्नडची सक्ती करून चुकीचे धोरण अवलंबिण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील मराठी भाषिक उमेदवारांवर अन्याय केला जात आहे. सदर अट रद्द करावी आणि अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना संधी द्यावी, यापूर्वी सरकारकडून ज्याप्रमाणे सदर पदांसाठी भरती करून घेतली आहे त्या नियमानुसारच आताही नेमणूक करून घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे. यावेळी शरयू खानापूरकर, बेबी देसाई, सरिता नार्वेकर, सुचिता गावडा, स्नेहा साबळे आदी उपस्थित होते.









