बार असोसिएशनचे मुख्य न्यायाधीशांना निवेदन
बेळगाव : चन्नगिरीचे भाजपचे आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांच्यावर लोकायुक्तांनी धाड घातली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. केवळ एका दिवसांतच त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. अशाचप्रकारे आता इतर सर्वसामान्य जनतेलाही न्यायालयाने जामीन मंजूर करावा, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्ताफा हुसेन एस. ए. यांना हे निवेदन देण्यात आले. आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत यांच्या कार्यालयाच्या निवासस्थानी लोकायुक्त पथकाने छापा टाकला. यावेळी 8 कोटी रुपये आढळून आले. त्यानंतर बुधवार दि. 8 रोजी उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. अशाचप्रकारे आता सर्वसामान्य जनतेला अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केल्यानंतर त्यांनाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्नट्टी, जनरल सेक्रेटरी अॅड. गिरीराज पाटील यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.









