मजगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव ; मजगाव (ता. बेळगाव) येथील तरुणाचा खून झाल्यानंतर गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करा, या मागणीसाठी विश्वकर्मा सेवा संघ आणि मजगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. तो आरोपी अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असून त्यामुळे मजगाव परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तेंव्हा त्याचा कायमचा बंदोबस्त करा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रवीण उर्फ छोट्या बाबू बळगण्णावर (वय 22, रा. मजगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने मंगळवारी दुपारी प्रतिक एकनाथ लोहार (वय 22, रा. मजगाव) या निष्पाप तरुणाचा स्व्रुड्रायव्हरने हल्ला करून खून केला आहे. त्यानंतरही संशयित आरोपी आणि इतर 10 ते 15 जणांनी मच्छे परिसरात तसेच उद्यमबाग आणि मजगाव येथेही पुन्हा दहशत माजविली आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. प्रवीण उर्फ छोट्या हा गांजा विक्री तसेच इतर गुन्ह्यांमध्ये नेहमीच सहभागी आहे. या प्रकरणी त्याच्यावर सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. आता तर त्याने एका निष्पापाचा बळी घेतला आहे. त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. खून करून पुन्हा तो मजगावमध्ये आला. त्यावेळी काही तरुणांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता जांबियाचा धाक दाखवुन त्याने पलायन केले होते. एक सराईत गुन्हेगार असून त्यामुळे मजगावमधील जनता भयभीत झाली आहे. तेंव्हा त्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी मल्लव्वा लोहार, यल्लु सुतार, रेखा सुतार, सुधा सुतार, कृष्णाबाई लोहार, अनिता लोहार, लक्ष्मी सुतार, निर्मला सुतार, अनुसया सुतार, रुपा लोहार, रेणुका लोहार, प्रशांत सुतार, अजय सुतार, नागेंद्र सुतार, प्रजोत मजुकर, आनंद लोहार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









