तयारीसाठी महिलांची लगबग : बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी
बेळगाव : गणरायापाठोपाठ गौराईचे आगमन होणार आहे. गुरुवार दि. 21 रोजी गौरी आगमनाचा सोहळा घरोघरी होणार आहे. गौरी आणण्याच्या अनेक प्रथा असून कोणी खड्याच्या, कोणी उभ्या तर कोणी तेरड्याच्या पानाच्या गौरी उभ्या करतात. काही ठिकाणी सुघडावर गौरी रेखाटन करण्याची प्रथा आजही कायम आहे. गुरुवारी होणाऱ्या गौरी आगमनाच्या सोहळ्यासाठी महिलांची लगबग सुरू झालेली आहे. गौरीचे मुखवटे बाजारात दाखल झाले आहेत. अलीकडे सुघडावर रेखाटन केलेल्या गौरीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. गौरीला प्रामुख्याने पहिल्या दिवशी भाकरी-भाजीचा साधा नैवेद्य दाखविला जातो. जेणेकरून सर्वांनाच गौरीच्या आगमनाचा सोहळा साजरा करता यावा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असणार आहे. गौरी आगमनासाठी आवश्यक असलेली गौरीची झाडे, तेरड्याची झाडे याबरोबरच ओटी भरण्यासाठी लागणारी काटेरी वाळूक, फळफळावळे, फुले यांची बाजारपेठेत आवक वाढली आहे.









