अनेक गावांत गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला पूर्णपणे फाटा : एकोपा टिकवून ठेवण्यासाठी होतेय मदत
आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
तालुक्यात मंगळवारपासून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू आहे. तालुक्यातील बऱ्याच गावात म्हणजे अवघ्या पंधराशे, दोन हजार वस्तीच्या गावातही दोन ते तीन सार्वजनिक मंडळे आहेत. यामुळे खर्चातही भर पडते. ग्रामीण भागात एकोपा टिकून राहण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना अधिक रुजविणे गरजेचे आहे. बेळगुंदी, जानेवाडी, बहाद्दरवाडी, बेन्नाळी, बंबरगे, हंदिगनूर, गौंडवाड, बाळगमट्टी गावांमध्ये आजही एक गाव एक गणपती परंपरा सुरू असून या गावांनी अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
बेळगुंदीत 96 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा
बेळगुंदी गावात गेल्या 96 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा अखंड आहे. बेळगुंदी हे आठ हजार लोकवस्तीचे गाव. मात्र येथील लोकांनी आजही एक गाव एक गणपतीची परंपरा टिकवून ठेवली असल्याने त्यांचा हा उपक्रम समाजहिताचा असून कौतुकास पात्र ठरत आहे. या गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबवून, पर्यावरणाचे संरक्षण, कला-क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रातील घटकांना वाव देण्यात येतो. गावातील काही जाणकर मंडळींनी गावात एकच सार्वजनिक गणपतीची संकल्पना केली. त्यानुसार 1927 साली कै. इराप्पा गुरव, कै. भैरु बाचीकर, कै. शंकर दातार आदींनी यासाठी पुढाकार घेतला व एक गाव एक गणपती करण्याचा निर्धार केला. यावेळी राकसकोप येथून कै. नारायण गुरव हे चालत गणपती आणत होते. प्रारंभी गावामध्ये एक झोपडी तयार करून त्या झोपडीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. अलीकडे बेळगुंदी गावचा विस्तार वाढतो आहे. मंडळ टिकून ठेवण्यासाठी कार्यकारिणीची निवड करण्याचा विचार गावकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला व प्रत्येक गल्लीतून दोघा जणांना घेऊन आठ सदस्यांची समिती स्थापन करून त्यांनी कार्यभार सांभाळायचा असे ठरले. ही कार्यकारिणी सदस्य नेहमी बदलण्यात येते. सध्या नाथाजी आमरोळकर, नंदू सुतार, विठ्ठल भडांगे, प्रदीप बोकमुरकर, रामकृष्ण पाटील, महादेव बेटगिरकर, यशवंत सुतार, रघुनाथ गावडा आदींची निवड करण्यात आली आहे.
जानेवाडीत 41 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा
जानेवाडी गावात गेल्या 41 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा अखंड आहे. 41 वर्षांपूर्वी गावातील चव्हाट गल्लीमधील समाज मंदिरात बैठक घेऊन गणेशोत्सव सुरू करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यानुसार सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गावात फक्त एकच सार्वजनिक मूर्ती पुजविण्याचा संकल्प करण्यात आला. काळू गुरव, मधु गुरव, नेमानी पावशे, गुंडू होनगेकर, रामचंद्र गोजेकर, मोनाप्पा पावशे, काळु पावशे आदींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावातील पंचमंडळी व पुनापा गोजेकर गुरुजी यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. गावातील या वडीलधारी मंडळींनी सुरू केलेली परंपरा आजही तरुण अखंडपणे चालवित आहेत. रोज महाआरती व भजन व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
बहाद्दरवाडी गणेश मंडळाचे 49 वे वर्ष
बहाद्दरवाडी गावात 1974 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. गावात यंदाही एक गाव एक गणपती ही संकल्पना जपली असून मंडळाचे यंदाचे हे 49 वे वर्ष आहे. 1974 साली काही तरुणांनी ब्रह्मलिंग युवक मंडळाची स्थापना केली होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन ब्रह्मलिंग मंदिरात एका बाजूला गणेशमूर्तीची स्थापना करून उत्सवाला सुरुवात केली.
ब्रम्हलिंग युवक मंडळाची पुनर्रचना
यानंतर यातील काही तरुण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेले. यावेळी कै. अशोक पाटील, कै. अरुण पाटील आदींनी या मंडळाचा कार्यभार सांभाळला होता. 1994 साली ब्रम्हलिंग युवक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मल्लाप्पा विष्णू पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. गावात गणपतीच्या आगमन मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे. केवळ टाळ मृदंगाच्या गजरात गणपतीची मूर्ती मिरवणूक काढण्यात येते. याला गावातील तरुणांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
बाळगमट्टीत 41 वर्षांची परंपरा
बेळगाव-चोर्ला रोड संतीबस्तवाड नर्सरीच्या बाजूलाच बाळगमट्टी हे गाव निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले आहे. या गावातही गेल्या 41 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा कायम आहे. गावातील वडीलधारी मंडळींनी सुरू केलेली ही परंपरा आजही तरुण मंडळी अगदी उत्साहाने जपताना दिसत आहेत. संपूर्ण गावकरी मिळून हा गणेशोत्सव साजरा करतात.









