वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या अखिल इंग्लंड पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे महिला दुहेरीतील आव्हान शनिवारी उपांत्य फेरीत समाप्त झाले.
या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठणाऱ्या टेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना मात्र पुन्हा अंतिम फेरीने हुलकावणी दिली. उपांत्य फेरीच्या सामन्यात कोरियाची 20 वी मानांकित जोडी बायेक ना हे आणि ली सो ही यांनी केवळ 46 मिनिटांच्या कालावधीत ट्रेसा जॉली व गायत्री गोपीचंद यांचा 21-10, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 2001 साली भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक तसेच गायत्रीचे वडील पी. गोपीचंद यांनी पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले होते. तत्पुर्वी म्हणजे 1980 साली या स्पर्धेत भारताच्या प्रकाश पदुकोनने पहिल्यांदा एकेरीचे अजिंक्यपद मिळवले होते.
या स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ट्रेसा आणि गायत्री या सतराव्या मानांकित जोडीने चीनच्या ली वेन मेई आणि लियु झुआन यांचा तासभराच्या कालावधीत 21-14, 18-21, 21-12 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन तसेच महिला विभागात पी. व्ही. सिंधू यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्याचप्रमाणे सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनाही पुरुष दुहेरीत हार पत्करावी लागली आहे.









