पोलीस तपासात उघड
प्रतिनिधी/ पणजी
किनारपट्टीवरील रेस्टॉरन्ट मालक, हॉटेलवाले, नाईट क्लब मालक यांच्याकडून सरकारच्या नावे कथित खंडणी उकळल्याचा आरोप करणारे पत्र बनावट असल्याचे सीआयडी अधीक्षक निधीन वालसन यांनी सांगितले आहे. पत्रावर एकूण सातजणांच्या सह्या असून त्यात कुणाच्याही नावाचा उल्लेख झालेला नाही. ही तक्रार व्हिएतनाम क्रमांक 84 334364121 वरून व्हॉट्सअॅपद्वारे आली होती, नंतर त्याच क्रमांकावरून 16 मार्च रोजी वेगवेगळ्या नंबरवर ंव्हायरल करण्यात आली होती. सीआयडी पोलीस व्हिएतनाममधील व्हॉट्सअॅप स्त्रोताचा शोध घेत आहेत, असे सीआयडी अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले.
किनारपट्टी भागात मुख्यमंत्री निधी म्हणून खंडणी गोळा करण्याचे प्रकार होत असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना पाठविल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्याबात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ही माहिती मिळताच त्यांनी त्वरित या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला होता.
सीआयडी विभागाच्या पोलिसांनी याबाबत तपास करून ज्या दोन क्लब मालकांच्या आडनावाचा उल्लेख पत्रावरील सह्यामध्ये झाला आहे त्यांची कसून चौकशी केली. नंदन गोपाळ कुडचडकर आणि साहिल अडवलपालकर यांनी ते पत्र पाठविलेच नव्हते उलट आपल्या सहीचा वापर करून बनावटपत्र तयार केल्याची तक्रार दोघांनीही पर्वरी पोलीस स्थानक आणि पणजी पोलीस स्थानकात दाखल केली होती. पणजी व पर्वरी पोलिसांनी दोन्ही तक्रारी सीआयडी पोलिसांना दिल्या आहेत, असेही निधीन वाल्सन म्हणाले. तक्रारीवरून इतर नावे स्पष्ट होऊ शकली नाहीत. हा क्रमांक व्हिएतनामचा असून सायबर क्राईम युनिट तक्रारीचे मूळ शोधण्यासाठी चौकशी करत आहे. तक्रार टोपणनावाने असल्याने तक्रारीची सत्यता पडताळता आलेली नाही. तक्रारीचे मूळ हे परदेशातील, व्हिएतनाम येथील असून तक्रारकर्त्यांचा शोध न लागल्याने हे पत्र काही सायबर गुन्हेगारांनी किंवा असंतुष्ट लोकांनी गोवा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांची बदनामी करण्यासाठी केले होते असे दिसत असल्याचे, अधीक्षक वाल्सन म्हणाले.









