प्रवासी नसल्याने दिवसभर ताटकळत बसण्याची वेळ : प्रवासी वाहतुकीला मोठा फटका, अनेक वडापधारकांवर उपासमारीची वेळ
वार्ताहर /काकती
राज्य सरकारने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात हमी दिल्याप्रमाणे महिलांना मोफत बस प्रवासाला सुरुवात होऊन आठवडा झाला आहे. यामुळे होनगा ते बेळगाव खासगी प्रवासी टाटा मॅझीक, मिनी डोअर या प्रवासी वाहनमालकांवर दिवसभर ताटकळत थांबून, प्रवासीवर्गाची वाट पाहत बसावे लागत आहे. परिणामी प्रवासी वाहतुकीला मोठा फटका बसला असून उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता सरकारने या प्रवासी वाहनधारकांना सवलती देऊन पॅकेजीस घोषित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने शक्ती योजनेंतर्गत दि. 11 जूनपासून परिवहन मंडळाच्या बसमधून महिलांना मोफत प्रवास करण्याची सुविधा करून दिली आहे. परिणामी होनगा, काकती, यमनापूर, केएलई हॉस्पिटल ते हॉटेल रामदेवपासून राणी चन्नम्मा सर्कल ते बेळगाव स्टॅण्डपर्यंत महिला बसमधून प्रवास करीत आहेत. खासगी प्रवासी वाहनातून प्रवास करायला तयार नाहीत. या कारणास्तव टाटा मॅझीक, मिनी डोअर वाहने प्रामुख्याने होनगा या प्रमुख स्टॅण्डवर दिवसभर थांबवावी लागत आहेत. टाटा मॅझीक, मिनी डोअर वाहनांची संख्या 40 हून अधिक आहे. घरचे खाऊन प्रवाशांची वाट पहावी लागत आहे. यातील वाहनधारकांचा दोन दिवसांनी एकदा वाहन प्रवासाचा नंबर लागत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे रोड टॅक्स इतर शुल्क न आकारता सवलती व पॅकेज घोषित करावे, अशी मागणी होत आहे. मागील 2013 ते 2018 यावर्षी राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे काँग्रेस सरकार सत्तेत होते. त्यावेळी या सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा आणि शासनाला उत्पन्न मिळावे म्हणून टाटा मॅझीक, मिनी डोअर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना सवलती देऊन परवानगी दिली होती. सध्या हेच काँग्रेस सरकार महिलांना मोफत बसप्रवास जारी करून या खासगी वाहनधारकांना बेरोजगार करून पायाखाली तुडवत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकारने 50 टक्के टॅक्स-50 टक्के विमा प्रिमिअम कमी करावा
दर तीन महिन्याला मॅक्सी कॅबला 4 हजार रुपये टॅक्स भरावे लागते. वर्षाला 30 हजार रुपये भरावा लागतो. प्रवासी वर्गाची संख्याच कमी असल्याने टॅक्स कसा भरायचा. सरकारने 50 टक्के टॅक्स व 50 टक्के विमा प्रिमिअम कमी करावा, तरच प्रवासी वाहनधारक जगणार आहेत.
– भैरु लक्ष्मण नाईक (अध्यक्ष मॅक्सी कॅब संघटना)
प्रवासी वाहतूक व्यवसाय कसा चालवावा हीच समस्या
कोरोना काळात आमचा धंदाच बंद झाला होता. गेल्या वर्षभरापासून जेमतेम प्रवासी वाहतूक चालू होती. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय जगत होतो. आमचा आता प्रवासी वाहतूक व्यवसाय कसा चालवावा ही कठीण समस्या उभी राहिली आहे.
– परशराम मल्लाप्पा नाईक
हातावर घडी घालून रिकामे बसण्याची वेळ
रोजगारासाठी मी या व्यवसायात गेल्या 15 वर्षापासून आहे. सगळा खर्च काढता फक्त रोजंदारी मिळत होती. महिलांना प्रवास मुक्त केल्याने स्टेअरिंगवरचा हात बाजूला काढून, हातावर घडी घालून रिकामे बसण्याची वेळ आली आहे.
– सिद्राई निंगाप्पा नाईक
खासगी प्रवासी वाहनधारकांची बाजू पाहणे आवश्यक
माझ्या टाटा मॅझीकचा मेंटेनन्स वर्षाला 30 हजार रुपये येतो. तर टॅक्स, विमा आदींचा खर्च वगळून उरलेल्यांत जगत होतो. महिलांना मोफत बसप्रवासाची संधी देताना खासगी प्रवासी वाहनधारकांची बाजू पाहणे आवश्यक आहे. महिलांना मोफत प्रवासासाठी महिन्याला 2 हजार अनुदान दिले तरी आमच्या प्रवासी वाहनावर परिणाम होणार नाही. तरी सरकारने याचा विचार करावा.
– नागाप्पा यल्लाप्पा नाईक









