शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अन्नभाग्य योजनेला लागणारा तांदूळ राज्यातील शेतकऱ्यांकडूनच विकत घ्यावा. सरकार या योजनेसाठी इतर राज्यांतून तांदूळ खरेदी करतो. मात्र स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होवू शकतो. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांकडूनच तांदूळ खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गोर-गरीब जनतेसाठी सरकार विविध योजना राबवत असते. मात्र त्या योजना राबविण्यासाठी इतर राज्यातून विविध वस्तू खरेदी केल्या जातात. केंद्र सरकार सर्वच राज्यातून खरेदी करत असले तरी राज्य सरकारने लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या राज्यातील शेतकरी किंवा इतर उत्पादकांकडून खरेदी कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होवू शकतो, असेही या निवेदनात म्हटले आहे. अप्पर जिल्हाधिकारी के. शांताला यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धगौडा मोदगी, जी. बी. कुलकर्णी, स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या शिवलिला मिसाळे, गीता दऱ्याण्णावर, संजू डोंगरगावी, रमेश रामगौंडण्णावर, शंकर ढवळी यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









