आगोंदपासून गावडोंगरीपर्यंत उभारण्यात येत असलेल्या घरांना भेट, सरकारला अहवाल सादर करणार
काणकोण : काणकोणात सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून श्रमधाम योजनेच्या अंतर्गत बांधायला घेतलेल्या घरांना स्वयंपूर्ण मित्र म्हणून वावरत असलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ही सर्व घरे बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येत असून त्यासाठी स्थानिक लोकांनी जसे श्रम दिले आहे त्याचप्रमाणे धनही दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात लोकांशी संपर्क साधताना काही लोकांची परिस्थिती पाहून आपण त्याचवेळी निर्धार केला होता की, या मतदारसंघातील घर नसलेल्यांना पक्की घरे बांधून द्यायची. काणकोणच्या भाजप कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर सध्या 20 घरांसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले असून 10 घरे पहिल्या टप्प्यात बांधायला घेतली आहेत. या सर्व घरांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या स्वयंपूर्ण मित्रांनी यासंबंधीचा अहवाल सरकारला सादर करावा. सर्व गोष्टी सरकारवर सोपवून गप्प न राहता सरकार आणि जनता यांच्या समन्वयातून जर अशा प्रकारची बेघर लोकांना पक्की घरे उभारून देण्याची नवी योजना तयार करणे शक्य असेल, तर त्यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मकदृष्ट्या विचार करावा, असे आवाहन सभापती तवडकर यांनी राजबाग, तारीर येथे आयोजित बैठकीत केले.
सध्या बांधायला घेतलेल्या घरांची पूर्वस्थिती आणि सध्याची बांधकामाची स्थिती यासंबंधीची एक चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. या तुकडीमध्ये उत्तर आणि दक्षिण गोव्यात स्वयंपूर्ण मित्र म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या आईशा वायंगणकर, वर्षा नाईक, माया पेडणेकर, लेविन्सन मार्टिन्स, जॉन्सन फर्नांडिस, संजीव देसाई, अजय गावडे, विनायक वळवईकर, परेश फळदेसाई, अजित पंचवाडकर, अरविंद खुटकर, ए. डब्ल्यू. राणे, जुझे मास्कारेन्हस, विश्वंभर भेंडे, रमेश गावकर, कालिदास गोखले, डॉ. राजेश चितारी यांचा समावेश होता. आगोंद ते गावडोंगरीपर्यंतच्या भागांत उभारण्यात येत असलेल्या या घरांची सर्वांनी पाहणी केली आहे. सरकारच्या आदेशानुसार आम्ही या घरांची पाहणी करायला आलेलो असून यासंबंधीचा अहवाल सरकारला दिला जाईल, अशी माहिती काही स्वयंपूर्ण मित्रांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. यावेळी अजित पंचवाडकर यांनी आपली वैयक्तिक 10 हजार रुपयांची मदत या प्रकल्पासाठी सभापती तवडकर यांच्याकडे सुपूर्द केली. एवढेच नव्हे, तर या योजनेच्या अंतर्गत एका घराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शविली. सध्या जी घरे बांधायला घेतली आहेत त्यात पोमू मिराशी झिलतावाडी गावडोंगरी, नागी ठको वरक दाबेल पैंगीण, कुशावती भगत कुंभेगाळ पैंगीण, हरिश्चंद्र नाईक अर्धफोंड पैंगीण, तनुजा धुरी, देवयानी पागी तारीर काणकोण, यशवंत देसाई किंदळेबाग, एरोबियल फर्नांडिस होवरे, सुजाता पागी धवलखाजन व निर्मल पागी कराशिरमळ आगोंद यांचा समावेश आहे. प्रत्येक घरासाठी 8 ते 10 लाख रु. इतका खर्च येत असून सध्या सुरू केलेली बांधकामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 10 घरांचे काम हातात घेण्यात येणार असल्याचे सभापतींनी यावेळी स्पष्ट केले.









